मुंबई : नोकरीवरून अचानक काढून टाकल्याच्या रागातून आणि नैराश्यातून एका २८ वर्षीय डॉक्टरने गुरुवारी सकाळी शीव (सायन) रेल्वे स्थानकातील उंचावर असलेल्या हाय-टेन्शन विजेच्या टॉवरवर चढून फाशी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी ऐनवेळी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या डॉक्टरचे प्राण वाचवण्यात यश आले. या घटनेमुळे सकाळी सायन स्टेशनवर प्रवाशांची मोठी पळापळ आणि घबराट उडाली होती.
डॉ. राजेंद्र नावुरकर (वय २८, रा. फलटण, जि. सातारा) असे या डॉक्टरचे नाव आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याच्या कारणावरून त्यांना कंपनीने नोकरीवरून काढून टाकले होते. या अन्यायकारक कारवाईमुळे व्यथित झालेल्या डॉक्टरने गुरुवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास सायन रेल्वे स्थानकातील सुमारे १०० फूट उंच टॉवरवर धाव घेतली. आपणास त्वरित कामावर परत घ्यावे आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी ते टॉवरवर चढले होते.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि अग्निशामक दलाची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी त्यांना खाली उतरण्याची अनेकदा विनंती केली, मात्र त्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी गळ्यात फास लावून थेट टॉवरवरून उडी घेतली. हे पाहताच क्षणाचाही विलंब न करता पोलीस आणि अग्निशामक जवानांनी तातडीने टॉवरवर चढून त्यांना खाली उतरवले. मात्र, खाली आणले तेव्हा त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती आणि त्यांचा श्वास रोखला गेला होता.
सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विलंब न करता त्यांना घटनास्थळीच 'सीपीआर' दिला. या प्रथमोपचारांमुळे त्यांच्या श्वासाला पुन्हा गती मिळाली. त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस सखोल चौकशी करत असून, घटनेमागची नेमकी कारणे शोधली जात आहेत.