मुंबई

Mumbai : एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा; दोन वर्षांत नवा दुमजली पूल उभारणार

परळ आणि प्रभादेवीला जोडणारा ११३ वर्षांचा इतिहास असलेला एल्फिन्स्टन रोड उड्डाणपूल रविवारी  इतिहासजमा झाला. या पुलाचे शेवटचे गर्डर काढण्याचे काम रविवारी यशस्वीपणे पूर्ण झाले. दरम्यान, प्रभादेवी उड्डाणपुलाच्या पाडकामासाठी दीड तास विलंब झाल्याने सीएसएमटी ते दादर दरम्यान अप आणि डाऊन लोकल सेवा सकाळी ७.०६ वाजता सुरू झाली. तर, सर्व मार्गिका सुरळीत होण्यास ७.१४ वाजले. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

Swapnil S

मुंबई : परळ आणि प्रभादेवीला जोडणारा ११३ वर्षांचा इतिहास असलेला एल्फिन्स्टन रोड उड्डाणपूल रविवारी  इतिहासजमा झाला. या पुलाचे शेवटचे गर्डर काढण्याचे काम रविवारी यशस्वीपणे पूर्ण झाले. दरम्यान, प्रभादेवी उड्डाणपुलाच्या पाडकामासाठी दीड तास विलंब झाल्याने सीएसएमटी ते दादर दरम्यान अप आणि डाऊन लोकल सेवा सकाळी ७.०६ वाजता सुरू झाली. तर, सर्व मार्गिका सुरळीत होण्यास ७.१४ वाजले. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ आणि ५ एप्रिलच्या मध्यरात्री सीएसएमटी ते दादर दरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेऊन हे काम पूर्ण केले. रविवारी सकाळी ७.३० वाजता उपनगरीय रेल्वे सेवा पुन्हा सुरू झाली. प्रभादेवी रोड ओव्हरब्रिज म्हणून ओळखला जाणारा हा पूल जुना झाल्यामुळे आता त्याऐवजी वरळी-शिवडी उन्नत मार्ग प्रकल्पाचा भाग म्हणून नवा दुमजली पूल बांधला जाणार आहे. हा नवा पूल पुढील दोन वर्षांत वाहतुकीसाठी उपलब्ध होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

एल्फिन्स्टन पूल पाडल्यामुळे आता कुर्ला ते परळ दरम्यान दोन अतिरिक्त रेल्वे मार्गिकांसाठी जागा मिळाली आहे. मुंबई नागरी परिवहन प्रकल्पांतर्गत (एमयूटीपी) या मार्गिका भविष्यात सीएसएमटीपर्यंत वाढवल्या जाणार आहेत.

त्यामुळे मध्य रेल्वेचे दिवसभराचे वेळापत्रक कोलमडले. कुर्ला, ठाणे आणि दादरपर्यंत धावणाऱ्या लोकल धीम्या गतीने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना लोकल मधून उतरून पर्यायी मार्गाने इच्छित स्थळी जावे लागले. वेळापत्रक बिघडल्याने स्थानकांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.

ब्लॉकमुळे सीएसएमटी ते मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करून ही रेल्वेगाडी पहाटे ५.४० वाजता चालवण्याचे नियोजन केले होते. मात्र ही रेल्वेगाडी सकाळी ७.२८ वाजता सीएसएमटीवरून सुटली. त्यामुळे या रेल्वेगाडी १०८ मिनिटे उशिराने धावली. तर दादर - सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करून ही रेल्वेगाडी सकाळी ६.३० सुटण्याचे नियोजन केले. परंतु, ही रेल्वेगाडी दादरवरून सकाळी १०.०२ वाजता सुटली. तब्बल ३.३० तास रेल्वेगाडी उशिरा सुटल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. रविवारी बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे प्रवासाचे पुढील नियोजन विस्कळीत झाले. तसेच गाडी क्रमांक १७६१७ सीएसएमटी - नांदेड तपोवन एक्स्प्रेस सकाळी ६.३० वाजता सुटण्याचे निश्चित केले होते. परंतु, ही रेल्वेगाडी सकाळी ८ वाजता सुटली.

२० ब्लॉक्समध्ये पूल पाडला

हा पूल पाडण्यासाठी रेल्वेने टप्प्याटप्प्याने नियोजन केले होते. पुलाचा स्लॅब, पाईपलाइन, केबल्स आणि पदपथ काढण्यासाठी सुमारे २० कॉरिडॉर ब्लॉक्स घेतले होते. अंतिम टप्प्यात ८०० टन क्षमतेच्या महाकाय क्रेनच्या सहाय्याने मुख्य गर्डर हटवले. यासाठी अभियांत्रिकी, वाहतूक आणि ट्रॅक्शन विभागाच्या ९५ कर्मचाऱ्यांनी रात्रभर परिश्रम घेतले. आसपासच्या उंच इमारती, अरुंद रस्ते आणि जुन्या वास्तूचा कमकुवत झालेला भाग यामुळे हे काम आव्हानात्मक होते, असेही निला यांनी स्पष्ट केले.

एल्फिन्स्टन पूल गिरणगावचा साक्षीदार

१९१३ मध्ये बांधलेल्या या पुलाचा रेल्वे मार्गावरील विस्तार ३७ मीटर होता आणि त्याची रुंदी १३.५३ मीटर होती. पोलादी गर्डर आणि कमानींनी बनलेली ही वास्तू मुंबईच्या गिरणगावच्या इतिहासाची साक्षीदार होती.

बदलापुरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात; १६ ऑक्टोबरपासून चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा बंद

Mumbai : स्वतः बसवलेल्या CCTV मध्येच कैद झाला मृत्यूचा क्षण! घाटकोपरमध्ये भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Kalyan-Dombivli : केडीएमसीत ३६ तास पाणीकपात; १५ ऑक्टोबरला २४ तास पाणीपुरवठा बंद

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...