मुंबई : मुंबईत उंच गणेश मूर्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असतानाच यंदाही ६ फुटांपर्यंतच्या गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करणे बंधनकारक असणार आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत असताना भक्तांची कृत्रिम तलावांना पसंती मिळत असल्याने यंदा ३५५ कृत्रिम तलावांची विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. आपल्या प्रभागात विसर्जन स्थळ कुठे याची माहिती गुगल अॅप, क्यूआर कोड स्कॅन करताच मिळणार आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने यंदा गणेशमूर्ती विसर्जनासाठी व्यापक नियोजन केले आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने यंदाही कृत्रिम विसर्जन स्थळांवर भर देण्यात आला आहे. गेल्या वर्षी २९८ कृत्रिम तलाव होते, त्यात वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबईत ४५ समुद्रकिनारे, २३ नैसर्गिक तलाव आणि तब्बल ३५५ कृत्रिम विसर्जन स्थळांची व्यवस्था करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास कृत्रिम तलावांना भाविकांनी दिलेली पसंती स्पष्ट होते. २०२५ मध्ये २९८ कृत्रिम स्थळांवर १ लाख ८४ हजार २ मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. हे एकूण विसर्जित मूर्तीपैकी सुमारे ९८ टक्के तर नैसर्गिक स्थळांवर ४,३८५ मूर्तीचे विसर्जन झाले होते.
फिरते कृत्रिम तलाव
कृत्रिम तलाव सोसायट्यांमध्ये, त्यांच्या परिसरातच उभारताना, चौपाट्यांलगतही उभारण्यात येणार आहेत. याशिवाय वाहनावर उपलब्ध करून फिरते कृत्रिम तलावांची सुविधाही गणेशभक्तांना उपलब्ध केली जाणार आहे. ते काही प्रभागात उपलब्ध केले जाणार आहेत.
आगमन-विसर्जन मार्ग खड्डेमुक्तीचा दावा !
यंदा आगमन व विसर्जन मार्गावरील अडथळा निर्माण करणाऱ्या २८१ ठिकाणच्या केबल्स काढून टाकण्यात आल्या आहेत तर एकूण ५०६ रस्त्यांवरील ४ हजार २७९ खड्डे व १७१ ड्रेनेज कव्हर्सची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
एका क्लिकवर माहिती
गणेशोत्सवात मंडप परवानग्यांसाठीही ऑनलाइन 'वन विंडो' प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. यंदा आतापर्यंत १,२९९ मंडळांकडून अर्ज प्राप्त झाले असून त्यांची पोलीस आणि महापालिका स्तरावर छाननी सुरू आहे. गेल्या वर्षी २,७०२ मंडप परवानग्या जारी करण्यात आल्या होत्या. विसर्जन व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी १,१३२ जीवरक्षक, ८५ रुग्णवाहिका, ३४ क्रेन, १० मोटरबोटी तसेच ३,११९ महापालिका कर्मचारी आणि ५७६ अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत. पर्यावरण संवर्धन, जलप्रदूषण नियंत्रण आणि विसर्जन प्रक्रियेतील सुरक्षितता लक्षात घेता कृत्रिम तलावांचा वापर वाढवण्यावर पालिका यंदाही भर देणार आहे.