Mumbai : कामाठीपुरा क्लस्टर पुनर्विकासाचा आराखडा आज होणार सादर; ३४ एकरांतील १,२९२ इमारतींचा समावेश प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : कामाठीपुरा क्लस्टर पुनर्विकासाचा आराखडा आज होणार सादर; ३४ एकरांतील १,२९२ इमारतींचा समावेश

कामाठीपुरा क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाचा प्रस्तावित आराखडा शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी स्थानिक रहिवासी आणि विविध भागधारकांसमोर सादर करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : कामाठीपुरा क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाचा प्रस्तावित आराखडा शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी स्थानिक रहिवासी आणि विविध भागधारकांसमोर सादर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या (एमबीआरआरबी) वतीने ‘कामाठीपुरा विकास समिती’च्या सहकार्याने या आराखड्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता कामाठीपुरा येथील सहाव्या लेनमधील अखिल पद्मशाली समाज, भावना बाग येथे हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी म्हाडाकडून पुनर्वसनाची रणनीती, लाभार्थी, प्रस्तावित नागरी सुविधा, पायाभूत सुविधा, पर्यावरणविषयक उपाययोजना आणि परिसराच्या भविष्यातील विकास आराखड्याची माहिती देण्यात येणार आहे.

जीर्ण आणि धोकादायक इमारतींच्या जागी सुरक्षित आणि आधुनिक घरे उभारण्यासोबतच संपूर्ण परिसराचा एकात्मिक पद्धतीने विकास करण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

९४३ सेस इमारती, ३४९ नॉन-सेस इमारती

कामाठीपुरा क्लस्टर पुनर्विकास प्रकल्प सुमारे ३४ एकर क्षेत्रावर राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात ९४३ सेस इमारती आणि ३४९ नॉन-सेस इमारती, अशा एकूण १,२९२ इमारतींचा समावेश आहे. या प्रकल्पाशी ८ हजारांहून अधिक रहिवासी आणि भाडेकरू संबंधित आहेत. त्यामध्ये सुमारे ६,६२५ निवासी आणि १,३७६ व्यावसायिक भाडेकरू, तसेच सुमारे ८०० जमीनमालकांचा समावेश आहे.

रहिवाशांच्या सहभागावर भर

या सादरीकरणाच्या माध्यमातून भाडेकरू, जमीनमालक, मालमत्ताधारक आणि अन्य स्थानिक भागधारकांना प्रस्तावित पुनर्विकासाची रचना आणि पुनर्वसनाची प्रक्रिया समजून घेण्याची संधी मिळणार आहे. मुंबईतील सर्वांत जुन्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या परिसरांपैकी कामाठीपुरामध्ये गेल्या अनेक दशकांत निवासी आणि व्यावसायिक स्वरूपाची दाट वस्ती विकसित झाली आहे. मोठ्या प्रमाणावर जुन्या आणि जीर्ण इमारती असलेल्या या परिसराचा स्वतंत्र इमारतीनुसार पुनर्विकास करण्याऐवजी क्लस्टर पद्धतीने एकात्मिक विकास करण्याचा प्रयत्न आहे. कामाठीपुराचा सर्वसमावेशक विकास करण्याची संधी म्हणून याकडे पाहिले जात आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

वीजचोरांवर AI चा 'सर्जिकल स्ट्राईक'; तीन महिन्यांत २८ हजार वीजचोरीचा पर्दाफाश, २८९ प्रकरणांत फौजदारी गुन्हे दाखल

Mira-Bhayandar : उत्तन-पाली डम्पिंगला हरित लवादाचा दणका; तीन महिन्यांत ९.०९ लाख मेट्रिक टन कचरा हटवा

नांदेड-भोकर महामार्गावर भीषण अपघात; सहा ठार, दहा जण जखमी; भोकर व नांदेड येथे उपचार सुरू

Sindhudurg : पक्षाच्या प्रतिमेला ‘गालबोट’ लावणाऱ्यांची गय नाही! नितेश राणेंचा कार्यकर्त्यांना इशारा

Thane : रखडलेले SRA प्रकल्प आता रडारवर; अकार्यक्षम विकासकांना हटविण्याचे संकेत