KEM रुग्णालयात लिफ्ट बंदचे संकट कायम; रुग्णांच्या स्थलांतरानंतर उपचारात अडचणी, ऑर्थोपेडिक विभागाकडून रुग्णांची विभागणी (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

KEM रुग्णालयात लिफ्ट बंदचे संकट कायम; रुग्णांच्या स्थलांतरानंतर उपचारात अडचणी, ऑर्थोपेडिक विभागाकडून रुग्णांची विभागणी

मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील बंद लिफ्टचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना, त्याचा थेट फटका आता रुग्णांच्या उपचार व्यवस्थेला बसू लागला आहे. लिफ्ट सुरू करण्याऐवजी रुग्णालय प्रशासनाला रुग्णांचीच विभागणी करण्याची वेळ आली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील बंद लिफ्टचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना, त्याचा थेट फटका आता रुग्णांच्या उपचार व्यवस्थेला बसू लागला आहे. लिफ्ट सुरू करण्याऐवजी रुग्णालय प्रशासनाला रुग्णांचीच विभागणी करण्याची वेळ आली आहे. हाताला फॅक्चर झालेल्या रुग्णांवर जुन्या इमारतीतील ऑर्थोपेडिक ओपीडीत उपचार केले जाणार आहेत, तर पायाला फॅक्चर झालेल्या रुग्णांना लिफ्टची सुविधा असलेल्या नव्या इमारतीतील ओपीडीत पाठविण्यात येणार आहे. विशेष म्हणजेच रुग्णाला कोणत्या इमारतीत उपचार मिळणार, हे आता त्या रुग्णाच्या आजारापेक्षा रुग्णालयातील लिफ्टच्या उपलब्धतेवर ठरू लागले आहे.

केईएम रुग्णालयातील लिफ्ट बंद पडण्याचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांनी रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश रुग्णालय प्रशासनाला दिले. त्यानंतर ऑर्थोपेडिक विभागाने रुग्णांचे दोन गट करून उपचारासाठी स्वतंत्र इमारती निश्चित केल्या आहेत. मात्र, लिफ्ट बंद असल्यामुळे रुग्णांना वेगवेगळ्या इमारतींमध्ये पाठविण्याची वेळ येणे, ही रुग्णालयातील सुविधांच्या दुरवस्थेचीच गंभीर बाब मानली जात आहे.

ही बाब चिंताजनक

ऑर्थोपेडिक विभागात येणाऱ्या रुग्णांसाठी लिफ्ट अत्यंत महत्त्वाची असते. पायाला फॅक्चर झालेले, प्लास्टर केलेले किंवा शस्त्रक्रियेनंतर चालणे अशक्य असलेल्या रुग्णांना जिन्यांचा वापर करणे धोकादायक ठरू शकते. अशा रुग्णांना जुन्या इमारतीतील ओपीडीपर्यंत पोहोचताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी त्यांना नव्या इमारतीत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ही पर्यायी व्यवस्था म्हणजे कायमस्वरुपी उपाय नव्हे. लिफ्ट बंद असल्याने रुग्णालयाच्या उपचार व्यवस्थेतच बदल करावा लागणे, ही बाब चिंताजनक आहे.

लिफ्ट सुरू होण्याचा कालावधी अनिश्चित

बंद लिफ्टचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने ई-निविदा प्रसिद्ध केली आहे. केईएम रुग्णालयातील विविध लिफ्टची सुरक्षितता आणि स्थिरता सुधारण्यासाठी आवश्यक कामे या निविदेत समाविष्ट करण्यात आली आहेत. निविदा सादर करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आहे. त्यामुळे लिफ्ट दुरुस्तीची प्रक्रिया सुरू झाली असली तरी प्रत्यक्षात लिफ्ट पुन्हा सुरू होण्यासाठी किती कालावधी लागणार, हा प्रश्न कायम आहे.

रुग्णालयात इमारत शोधण्याची वेळ

केईएममध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आता ओपीडीत जाण्यापूर्वी कोणत्या इमारतीत उपचार होणार, याची माहिती घ्यावी लागत आहे. वृद्ध, दिव्यांग रुग्णांची या व्यवस्थेमुळे अधिकच गैरसोय होण्याची शक्यता आहे. रुग्णांना लिफ्टअभावी इमारती बदलण्याची वेळ येत असेल, तर रुग्णालयातील मूलभूत सुविधांच्या देखभालीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे. रुग्णांची विभागणी करून तात्पुरती सोय करण्यापेक्षा बंद लिफ्ट तातडीने सुरू करून रुग्णांना सुरक्षित आणि सुलभ उपचार मिळतील, याची जबाबदारी प्रशासनाने पार पाडणे आवश्यक आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

चिपी-नवी मुंबई विमानसेवा सोमवारपासून नियमित; आठवड्यातील सातही दिवस उड्डाणे; सिंधुदुर्गच्या पर्यटन आणि रोजगाराला मिळणार चालना

'खरे भाजपचे आहात का ? आधी डीएनए टेस्ट करा!' आमदार मंदा म्हात्रे यांचा गणेश नाईक यांचे नाव न घेता निशाणा

Mumbai : पालिकेचा अस्फाल्ट प्लांटचा भूखंड भाड्याने देणार; ८१५ कोटींचा भूखंड विकासकाच्या घशात घालण्याचा डाव

देशी पिस्तूल केवळ धोकादायक म्हणन 'प्रतिबंधित शस्त्र' ठरत नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Mumbai CNG Price Hike: आता सीएनजीही महाग; किलोमागे १.५० वाढ, नवा दर ९१.५० रुपये