मुंबई : दर्जेदार आरोग्य सुविधा या विश्वासाने रुग्ण मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असतात. मात्र केईएम रुग्णालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून पायाला प्लास्टर असलेल्या रुग्णांना वरच्या मजल्यावर जाण्यासाठी घासत घासत पायऱ्या चढून जाण्याची वेळ आली.
केईएम रुग्णालयातील हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते अमय घोले यांनी एक्सवर पोस्ट करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, केईएम रुग्णालयातील रुग्णांचा व्हिडिओ वायरल झाला असून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करत पदावरुन हटवा, असे निर्देश आरोग्य समिती अध्यक्ष हरिश भांदिर्गे यांनी दिले.
परळच्या केईएम रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) लिफ्ट गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून उपचारासाठी येणाऱ्या गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना, ज्येष्ठ नागरिकांना तसेच दिव्यांगांना जिने चढून उपचारासाठी जावे लागत असल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. रुग्णांना उपचार देण्याऐवजी त्यांची ससेहोलपट करणाऱ्या या व्यवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या प्रकरणावर आवाज उठवत अमय घोले यांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले आहे. रुग्णालयातील विविध लिफ्टच्या सुरक्षिततेसह दुरुस्ती आणि देखभालीसाठी ६ नोव्हेंबर रोजी निविदा काढल्याची माहिती समोर आली आहे. मग लिफ्ट बंद पडण्यापूर्वी किंवा त्या बंद असताना त्यांची दुरुस्ती का करण्यात आली नाही, असा सवाल घोले यांनी उपस्थित केला आहे. लिफ्ट बंद असल्याने गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसह ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना जिने चढण्याची वेळ येणे ही रुग्णालय व्यवस्थेची गंभीर त्रुटी असल्याचे ते म्हणाले. केवळ लिफ्ट दुरुस्त करून हा विषय संपणार नाही, तर इतके दिवस लिफ्ट बंद राहण्यास जबाबदार कोण, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
केईएम रुग्णालयातील सेठ धुरमल बजाज अस्थिव्यंग केंद्रामध्ये रुग्णांना किती हाल सहन करावे लागत आहेत, याबाबतचा व्हिडिओ वायरल झाला, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. रुग्णाला जिन्यावरून घसरत उतरावे लागते.
पायाला प्लास्टर असलेला एक वृद्ध रुग्ण जिन्याच्या पायऱ्यांवर बसून, एकेक पायरी घसरत खाली उतरत आहे. त्यांना व्हीलचेअर नाही, स्ट्रेचर नाही, आधाराला कर्मचारी नाही. बाजूने लोक ये-जा करत आहेत, पण कोणीही मदतीला येत नाही. प्लास्टर घातलेल्या पायाला धक्का लागला तर फ्रॅक्चर बिघडू शकते, रुग्ण पडू शकतो. आणि त्यांचा जीवही धोक्यात येऊ शकतो, असेही हरिश भांदिर्गे यांनी सांगितले.
दोषींवर कठोर कारवाई करत अहवाल सादर करा!
बंद असलेल्या लिफ्टची तातडीने सुरक्षित दुरुस्ती करून त्या रुग्णांच्या सेवेत सुरू कराव्यात, लिफ्ट किती दिवसांपासून बंद आहेत याचा सविस्तर अहवाल सार्वजनिक करावा, तसेच देखभाल कंत्राटदार, अभियंते आणि संबंधित अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी, आदी मागण्या केल्या आहेत. दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनासह कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी आणि संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे