मुंबई

Mumbai : पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांना दिलासा; स्थानक परिसरांत ३२५ डिजिटल ATVM ची सोय, कसा आणि काय होणार फायदा?

सध्या पश्चिम रेल्वेच्या मार्गावर ५०१ ATVM कार्यरत आहेत. यापैकी ११० मशीन्सचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ती बदलली जाणार आहेत. उर्वरित मशीन्स प्रवाशांच्या सोयीसाठी सोयीच्या दृष्टीने गर्दी असलेल्या ठिकाणी हलवण्यात येणार आहेत.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : मुंबईकरांसाठी रेल्वेचे तिकीट काढणे आता अधिक वेगवान आणि सोयीचे होणार आहे. पश्चिम रेल्वेने उपनगरीय रेल्वे मार्गावर तब्बल ३२५ नवीन ऑटोमॅटिक टीकेट व्हेंडिंग मशीन (ATVM) बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे तिकीट खिडक्यांवरील लांबलचक रांगा कमी होणार असून प्रवाशांना डिजिटल तसेच सेल्फ सर्व्हिस तिकिटिंगचा पर्याय मिळेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन ऑटोमॅटिक टिकट व्हेंडिंग मशीन स्टेशन परिसरांत तसेच पादचारी पूलांवर बसवले जाणार आहेत, ज्यामुळे गर्दीच्या वेळेत प्रवाशांना तिकीट सहज उपलब्ध होतील. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, हे मशीन पूर्वीपेक्षा जलद काम करतील आणि युपीआयसह विविध डिजिटल पेमेंट पर्याय उपलब्ध करून देतील.

चर्चगेट स्थानकात मोहिमेचा शुभारंभ

'मेरा टिकट, मेरी शान - आत्मनिर्भर भारत के लिए मेरा योगदान' या मोहिमेअंतर्गत चर्चगेट स्थानकात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पश्चिम रेल्वेचे प्रभारी महाव्यवस्थापक प्रदीप कुमार यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले.

यावेळी प्रदीप कुमार म्हणाले, "वैध तिकीट घेऊन प्रवास करणारा प्रत्येक प्रवासी रेल्वेच्या आधुनिकीकरणात आणि देशनिर्मितीत थेट योगदान देतो. त्यामुळे प्रवाशांनी नेहमी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा."

जुन्या मशीन्समध्ये बदल

सध्या पश्चिम रेल्वेच्या मार्गावर ५०१ एटीव्हीएम (ATVM) कार्यरत आहेत. यापैकी ११० मशीन्सचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ती बदलली जाणार आहेत. उर्वरित मशीन्स प्रवाशांच्या सोयीसाठी सोयीच्या दृष्टीने गर्दीच्या ठिकाणी हलवली जाणार आहेत.

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, पूर्वी अनेकदा एटीव्हीएम बंद असणे, गर्दीच्या वेळी उपलब्ध नसणे, मशीन्स खराब असणे अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या होत्या. मात्र, नवीन मशीन्स अधिक विश्वासार्ह असतील आणि तिकीट खिडक्यांवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी करतील.

कसा आणि काय होणार फायदा?

नवीन एटीव्हीएममध्ये युपीआय (UPI) आणि इतर डिजिटल पेमेंट मोडची सुविधा दिली जाणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना रोख रक्कम ठेवण्याची गरज राहणार नाही. शिवाय, रेल्वेने रेल वन (Rail One) मोबाइल अ‍ॅपही सुरू केले असून, प्रवासी आता थेट मोबाईलवरूनही तिकीट काढू शकतात.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, आधुनिक एटीव्हीएम आणि मोबाईल तिकीट प्रणालीमुळे प्रवाशांचा वेळ वाचेल, प्रवासाचा अनुभव सुधारेल आणि मुंबईची उपनगरीय रेल्वे अधिक कार्यक्षम बनेल.

Mumbai : रविवार ठरला घातवार! विविध अपघातांमध्ये ५ जण ठार, ९ जखमी

अडवाणी, सिसोदियांना नोटीस; मतदारयादी तपासणीमध्ये पूर्वीच्या यादीशी मेळ न जुळल्याने कारवाई

Maharashtra TET Paper Leak : दोन फरार आरोपींना अटक

Mumbai : आयआयटी प्राध्यापक मंचाचा दुल्ला यांना पाठिंबा

Mira-Bhayandar : मेट्रो ब्रिजचा ब्लॉक कोसळून तरुण जखमी