मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आगीच्या घटनांचे सत्र सुरू असतानाच मालाड पश्चिमेतील मालवणी परिसरात फटाक्यांच्या दुकानात भीषण आग लागली. फटाक्यांचा स्फोट झाल्याने दुकानाचे छत कोसळले. या दुर्घटनेत शहनवाज नियाज खान (१६) या मुलाचा होरपळून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह दुकानाच्या ढिगाऱ्यात आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मालाड पश्चिम येथील मालवणी गेट क्रमांक ८, अब्दुल हमीद मार्ग येथील तळमजल्यावरील एका दुकानात सोमवारी रात्री ९.५६ वाजण्याच्या सुमारास आग लागली. दुकानात फटाके, विद्युत वायरिंग आणि विद्युत उपकरणे होती. सुमारे २० बाय ३० फूट क्षेत्रफळाच्या दुकानात आग लागल्यानंतर फटाक्यांचे स्फोट झाले. या स्फोटाच्या तीव्रतेमुळे दुकानाचे छत कोसळले. दुकानात एक मुलगा बेपत्ता असल्याची माहिती अग्निशमन दलाला दिली असता त्यानुसार शोधमोहीम राबवण्यात आली असता शहनवाज खान हा मुलगा मृतावस्थेत आढळला. आगीत त्याचा संपूर्ण देह भाजला होता. त्याला खासगी रुग्णवाहिकेतून शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, अदानी इलेक्ट्रिसिटी, १०८ रुग्णवाहिका आणि संबंधित विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने रात्री १०.३६ वाजता आग पूर्णपणे विझवली.
भांडुपच्या ‘ड्रीम्स मॉल’मध्ये आग
भांडुप पश्चिम येथील एलबीएस मार्गावरील प्रसिद्ध ‘ड्रीम्स मॉल’मध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसले, तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अथक प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.