मुंबई

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार

शिवाजी पार्क आंदोलनादरम्यान पोलिस व्हॅनसमोर उभी राहिलेली तरुणी रिया अहीर हिने ऑनलाइन ट्रोलिंग, अश्लील बदनामी आणि सायबर छळाविरोधात महाराष्ट्र सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे.

Mayuri Gawade

मुंबई : शिवाजी पार्क येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीसमोर उभी राहिल्याने चर्चेत आलेली तरुणी रिया अहिर हिने आता सोशल मीडियावरील ट्रोलिंग, अश्लील बदनामी आणि ऑनलाइन छळाविरोधात महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या अपमानास्पद मोहिमेमुळे हा प्रकार आणखी वाढण्याची भीती व्यक्त करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही तिने केली आहे.

हिंदुस्तान टाइम्सशी संवाद साधताना रिया अहिरने सांगितले की, तिने शनिवारी ऑनलाइन तक्रार दाखल केली असून सोमवारी सायबर सेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.

सातत्याने ट्रोलिंग आणि अश्लील बदनामी

रिया अहिरच्या म्हणण्यानुसार, २२ जुलैच्या घटनेनंतर सोशल मीडियावर तिच्याविरोधात सातत्याने ट्रोलिंग, शिवीगाळ, अश्लील भाषेत टीका आणि चारित्र्यहनन सुरू आहे. "सध्या हा छळ सोशल मीडियापुरता मर्यादित आहे. मात्र, पुढे त्याचं गंभीर स्वरूप होऊ शकतं. याचा परिणाम माझ्या आई-वडिलांवर व्हावा, अशी माझी इच्छा नाही," असे ती म्हणाली.

त्या दिवशी पोलिसांच्या गाडीसमोर उभे राहण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना ती म्हणाली, "त्या वेळी मला जे चुकीचं वाटलं त्याविरोधात मी नागरिक म्हणून उभी राहिले. आता स्वतःवर होत असलेल्या अन्यायाविरोधातही आवाज उठवणं तितकंच गरजेचं आहे."

खोटे दावे करून दिशाभूल

रिया अहिरने आरोप केला की, काही सोशल मीडिया अकाउंट्स आणि कंटेंट क्रिएटर्स तिच्याविषयी खोटी माहिती पसरवत आहेत. तिच्या इंस्टाग्रामवरील फोटोंचा वापर करून ती अश्लील स्वरूपाचा मजकूर विकते किंवा त्यातून मोठी कमाई करते, असे दावे करण्यात येत आहेत. काही व्हिडिओंमध्ये तिची छायाचित्रे धूसर करून दिशाभूल करणारी माहितीही प्रसारित करण्यात आल्याचे तिने म्हटले.

"माझ्याबद्दल खोटं चित्र उभं केलं जात आहे. इंस्टाग्रामवरील एक्सक्लुझिव्ह सबस्क्रिप्शनसाठी माझं बँक खाते जोडलेलंही नाही. अशा कोणत्याही माध्यमातून मी एक रुपयाही कमावलेला नाही," असा दावा तिने केला.

'मॉर्फ फोटो व्हायरल करण्याचीही भीती'

भविष्यात आपली मॉर्फ केलेली छायाचित्रे किंवा खोटे फोटो व्हायरल करून आणखी बदनामी केली जाऊ शकते, अशी भीतीही रियाने व्यक्त केली.

"हा प्रकार आत्ताच थांबवणं गरजेचं आहे. सततचा ऑनलाइन छळ आणि महिलांना लक्ष्य करून होणारी अश्लील बदनामी यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. अशा प्रकारचा त्रास सहन करणाऱ्या इतर महिलांनीही पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी पुढे यावं," असे ती म्हणाली.

कपड्यांवरून होणाऱ्या टीकेलाही तिने उत्तर दिले. "देशासाठी आवाज उठवणाऱ्या प्रत्येक महिलेने साडीच घालायला हवी का? मॉडेलिंग हा माझा व्यवसाय आहे. ब्रँड आणि स्टायलिस्टच्या गरजेनुसार मी कपडे परिधान करते. त्याचा माझ्या देशाविषयीच्या आदराशी कोणताही संबंध नाही," असे तिने स्पष्ट केले.

वडिलांचीही प्रतिक्रिया

रिया अहिरचे वडील राजकुमार यादव यांनी सांगितले की, आंदोलनादरम्यान मुलीने घेतलेल्या भूमिकेनंतर काही लोक तिच्यावर टीका करतील, याची कल्पना होती. मात्र, सोशल मीडियावरून सुरू असलेला छळ आता मर्यादा ओलांडत असल्याचे त्यांनी म्हटले.

पोलिसांकडून तक्रारीची पडताळणी

दरम्यान, झोन १०चे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले की, रिया अहिरने दिलेल्या तक्रारीची पडताळणी सुरू असून, अद्याप या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आता पैशामुळे शस्त्रक्रिया थांबणार नाहीत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबईत ३३ ठिकाणी फ्लड गेट; पूरस्थितीचा इशारा देणारी सेन्सर यंत्रणा उभारणार; २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

BEST ला जाहिरातींचा आधार; दोन वर्षांत ११४.१३ कोटींचा महसूल जमा

Mumbai : हरित क्षेत्रातील सुविधांसाठी मोजा पैसे! कोस्टल रोड प्रकल्पातील ७० हेक्टर हरितक्षेत्र रिलायन्स फाऊंडेशन विकसित करणार

एसटीच्या पदोन्नती प्रक्रियेत कर्मचाऱ्यांच्या भवितव्याशी खेळ; चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी