मुंबई : वांद्रे (प.) येथील प्रसिद्ध माऊंट मेरी यात्रेनिमित्त भाविक आणि प्रवाशांची होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने २२६ अतिरिक्त बसगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. १३ सप्टेंबरपासून सुरू होणारी ही यात्रा २० सप्टेंबरपर्यंत चालणार असून या कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
माऊंट मेरी चर्च आणि ‘फादर ॲग्नेल आश्रम’ परिसरात यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. त्यामुळे बसगाड्यांचे थेट चर्चपर्यंत संचालन करणे शक्य नसल्याने वांद्रे रेल्वे स्थानक (पश्चिम) आणि हिल रोड परिसरादरम्यान अतिरिक्त बसगाड्या चालवण्यात येणार आहेत तसेच वांद्रे परिसरातील इतर मार्गांवरही आवश्यकतेनुसार बससेवा वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
विशेष बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन
यात्रेच्या काळात वांद्रे स्थानक आणि माऊंट मेरी चर्च परिसरात प्रवाशांना योग्य मार्गदर्शन व मदत मिळावी, यासाठी बेस्टतर्फे बसनिरीक्षक आणि वाहतूक अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. गर्दीचे नियोजन, वाहतूक नियंत्रण आणि प्रवाशांना माहिती देण्याची जबाबदारी हे अधिकारी सांभाळणार आहेत. माऊंट मेरी यात्रेला येणाऱ्या भाविकांनी या विशेष बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे.