मुंबईत 'पार्किंग' महागणार, १० टक्के दरवाढीचा प्रस्ताव; पालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी होणार सादर 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

मुंबईत 'पार्किंग' महागणार, १० टक्के दरवाढीचा प्रस्ताव; पालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी होणार सादर

मुंबईतील वाहनचालकांना लवकरच वाहनतळ शुल्कवाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने सार्वजनिक आणि ऑन-स्ट्रीट वाहनतळांच्या शुल्कात १० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील वाहनचालकांना लवकरच वाहनतळ शुल्कवाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने सार्वजनिक आणि ऑन-स्ट्रीट वाहनतळांच्या शुल्कात १० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. पुढील आठ ते दहा दिवसांत महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे मंजुरीसाठी तो सादर केला जाणार आहे. आयुक्तांची मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव स्थायी समिती आणि महापालिका सभागृहासमोर अंतिम मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

महापालिकेने २०१५ मध्ये सर्वसमावेशक ‘पे अँड पार्क’ धोरण तयार करताना पार्किंग शुल्कात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नागरिक आणि विविध राजकीय पक्षांच्या विरोधामुळे राज्य सरकारने त्या निर्णयाला स्थगिती दिली होती. नंतर स्थगिती उठविण्यात आली असली तरी शुल्क दर कायम ठेवण्यात आले. त्यानंतर २०२२ पासून प्रशासकीय राजवट असल्याने पार्किंग शुल्कात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती.

संबंधित विभागाने गेल्या तीन ते चार वर्षांतील महागाई आणि खर्चवाढ लक्षात घेऊन तब्बल ४६.४० टक्के शुल्कवाढीचा प्रस्ताव तयार करून आयुक्तांकडे सादर केला होता. मात्र एवढी मोठी वाढ नागरिकांसाठी योग्य ठरणार नसल्याचे मत व्यक्त करत आयुक्तांनी सर्व श्रेणीतील वाहनतळांसाठी पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी केवळ १० टक्के दरवाढीचा सुधारित प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुंबईतील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सध्या शहरात ५० लाखांहून अधिक नोंदणीकृत वाहने आहेत. मात्र वाहनांच्या तुलनेत पार्किंगची उपलब्धता अत्यल्प असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ही समस्या लक्षात घेऊन महापालिकेने बहुस्तरीय यांत्रिक वाहनतळांसह सार्वजनिक आणि रस्त्यावरील पार्किंग सुविधा विकसित केल्या आहेत. सध्या महापालिकेच्या अखत्यारीत ३७ सार्वजनिक वाहनतळ आणि ६७ ऑन-स्ट्रीट वाहनतळ कार्यरत आहेत.

अशी होणार दरवाढ

  • क वर्गातील वाहनतळ शुल्क : तीन व चार चाकी वाहनांसाठी एक तासासाठी २५ रुपये.

  • ३ ते ६ तासांसाठी : ४० रुपये आणि सहा ते बारा तासांसाठी- ७० रुपये.

  • दुचाकींना एक तासासाठी १० रुपये; ३ ते ६ तास २५ रुपये; सहा ते बारा तासांसाठी ३० रुपये

  • ब वर्गातील वाहनतळ शुल्क : तीन व चार चाकी वाहनांना एक तासासाठी-२० रुपये; ३ ते ६ तासांसाठी- ३५रुपये आणि ६ ते १२ तासांसाठी- ६० रुपये.

  • दुचाकींकरिता एक तासासाठी - ५ रुपये; ३ ते ६ तासांसाठी- २० रुपये; ६ ते १२ तासांसाठी - २५ रुपये

  • अ वर्गातील वाहनतळ : तीन व चार चाकी वाहनांना एक तासासाठी- २० रुपये; ३ ते ६ तासांसाठी- ३५ रुपये ६ ते १२ तासांसाठी- ६० रुपये

  • दुचाकींना एक तासासाठी ५ रुपये; ३ ते ६ तासांसाठी २० रुपये; ६ ते १२ तासांसाठी २५ रुपये मोजावे लागणार आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नेपाळमध्ये पुन्हा महापुराची भीती! मृतांचा आकडा ५४७ वर; ३२० भारतीय बेपत्ता; ४०० जण तिबेटच्या सीमेवर अडकले

Nepal Floods : राज्यातील ६० पर्यटकांशी अद्याप संपर्क नाही; २९० जण सुरक्षित, १०५ जण भारताच्या दिशेने रवाना

Mumbai : दूध १०२ रुपये लिटर; घाऊक दरात ९ रुपये वाढ; १ सप्टेंबरपासून सुटे दूध महागणार

माणसांसाठी सण की सणांसाठी माणूस?

आजचे राशिभविष्य, २९ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत