Mumbai : ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची विद्यार्थ्यांना धमकी; पोलीस दलातील चालकावर कारवाई 
मुंबई

Mumbai : ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची विद्यार्थ्यांना धमकी; पोलीस दलातील चालकावर कारवाई

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अमली पदार्थ (ड्रग्ज) ठेवून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि आयुष्यभर तुरुंगात सडवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Swapnil S

मुंबई : आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अमली पदार्थ (ड्रग्ज) ठेवून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि आयुष्यभर तुरुंगात सडवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी गुरुवारी चौकशीचे आदेश दिले असून त्याला पदावरून हटवण्यात आले आहे.

नवी दिल्लीतील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईतही विविध ठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. याच आंदोलनादरम्यान हा प्रकार घडल्याचे समोर आले. काँग्रेसच्या नेत्यांनी हा व्हिडीओ मीडियासमोर आणला व चौकशीची मागणी केली.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये, पोलीस दलातील एक चालक विद्यार्थी आंदोलकांना इशारा देताना दिसत आहे. पुन्हा आंदोलनात सहभागी झाल्यास ड्रग्स ठेवून खोटे गुन्हे दाखल केले जातील आणि संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवावे लागेल, अशी धमकी तो देत होता. हा कर्मचारी सायन पोलीस ठाण्यात कार्यरत होता असे कळते.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चौकशीचे आदेश देण्यात आले. तथ्यांची शहानिशा केल्यानंतर, चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित पोलीस चालकाला त्याच्या सध्याच्या पदावरून हटवण्यात आले आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

ही खाकी वर्दीतील गुंडगिरी असल्याची टीका करून काँग्रेसने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. जर पोलीस अशी धमकी देत असतील, तर त्यांना ड्रग्ज कुठून मिळणार, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही पक्षातर्फे करण्यात आली.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग