Mumbai : बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी सुरक्षारक्षक बडतर्फ (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

Mumbai : बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी सुरक्षारक्षक बडतर्फ

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणावेळी सुरक्षेत तैनात असलेल्या एका पोलीस हवालदारावर मुंबई पोलीस दलाने कठोर कारवाई केली आहे.

Swapnil S

मेघा कुचिक/मुंबई

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणावेळी सुरक्षेत तैनात असलेल्या एका पोलीस हवालदारावर मुंबई पोलीस दलाने कठोर कारवाई केली आहे. कर्तव्यात कसूर आणि निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल हेड कॉन्स्टेबल श्याम मगन सोनवणे यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त (संरक्षण आणि सुरक्षा) यांच्या कार्यालयाने यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत.

१२ ऑक्टोबर २०२४ रोजी वांद्रे पूर्व येथे बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला झाला, तेव्हा सोनवणे हे त्यांचे अंगरक्षक म्हणून सोबत होते. या घटनेनंतर १८ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर सुरू झालेल्या विभागीय चौकशीमध्ये ते दोषी आढळले. सप्टेंबर २०२५ मध्ये त्यांना बडतर्फीची नोटीस देण्यात आली होती. अखेर ३० एप्रिल २०२६ रोजी त्यांना सेवेतून काढून टाकण्याचा अधिकृत निर्णय घेण्यात आला. सोनवणे यांनी २ मे २०२६ रोजी या कारवाईचा आदेश स्वीकारला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्यासाठी ‘२+१’ सुरक्षा व्यवस्था होती. दिवसा दोन आणि रात्री एक पोलीस कर्मचारी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असायचा. हल्ल्याच्या दिवशी रात्री ८.३० वाजता एक कर्मचारी ड्युटी संपवून गेल्यानंतर सोनवणे एकटेच सिद्दीकी यांच्यासोबत होते. रात्री ९.३० च्या सुमारास जेव्हा हल्लेखोरांनी गोळीबार केला, तेव्हा सोनवणे यांनी कोणतीही हालचाल केली नाही किंवा हल्लेखोरांना प्रत्युत्तर दिले नाही.

या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान सोनवणे यांनी स्वतःचा बचाव करताना सांगितले की, दसऱ्यामुळे परिसरात फटाक्यांची मोठी आतषबाजी सुरू होती. मिरवणुकांचा गोंधळ आणि आवाजामुळे त्यांना गोळीबाराचा अंदाज आला नाही आणि हल्लेखोरांना ओळखता आले नाही. मात्र, विभागाने त्यांचा हा दावा फेटाळून लावत त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली आहे. हल्ल्याच्या वेळी सिद्दीकी यांच्यासोबत कोणतेही खासगी सुरक्षारक्षक नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईला मिळणार आणखी स्वच्छ व शुद्ध पाणी; पिसे पांजरापूर येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारणीला गती, पालिका २३ कोटी रुपये मोजणार

रुपाली चाकणकरांची SITकडून ६ तास चौकशी; भोंदू अशोक खरातप्रकरणी आर्थिक व्यवहार आणि पूजा-विधींबाबत विचारले प्रश्न

पोहणेही झाले आता महाग! BMC च्या जलतरण तलावाच्या शुल्कात वाढ; सभासदांना आता ५ टक्के अधिक मोजावे लागणार

थलपती विजय तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री; चेन्नईतील राजभवनात आयोजित दिमाखदार सोहळ्यात पार पडला शपथविधी

काँग्रेस खंजीर खुपसणारा पक्ष! तमिळनाडूवरून पंतप्रधान मोदींची जोरदार टीका