मुंबई : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे काही महिन्यांपूर्वी चार वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपीला अल्पावधीतच न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. मात्र, त्यानंतरही महिलांवरील आणि लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. अशातच आता दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात आठ वर्षीय चिमुरडीवर सुरक्षा रक्षकाने शौचालयात कथित लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. १२) उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, घटनेनंतर परिसरात संतप्त नागरिकांनी आंदोलन केले.
शौचालयात नेऊन कथित लैंगिक अत्याचार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायधुनी परिसरातील एका शौचालयात सुरक्षा रक्षकाने आठ वर्षीय मुलीवर कथित लैंगिक अत्याचार केला. घटनेनंतर मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक केली.
पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांचा संताप
या घटनेची माहिती समोर येताच परिसरात संतापाची लाट उसळली. शेकडो नागरिक पायधुनी पोलीस ठाण्याबाहेर जमले आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. आंदोलकांनी काही काळ पोलीस ठाण्यासमोरील रस्ता रोखल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर घटनेची माहिती घेतल्यानंतर पायधुनी पोलीस ठाण्यात पोहोचले. यावेळी काही आंदोलकांनी त्यांना घेराव घालत आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक पूर्ववत सुरू केली.
सध्या कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
रोहित पवार यांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा निषेध करत सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केली. नसरापूर प्रकरणानंतर इतक्या लवकर पुन्हा अशा प्रकारची घटना घडणे अत्यंत धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अशा गुन्ह्यांमध्ये जलद न्याय मिळणे आणि आरोपींवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे सांगत, शक्ती कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच विधिमंडळाच्या सुरू असलेल्या अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित केल्याचे त्यांनी सांगितले. पीडित चिमुरडी लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली.
नसरापूर प्रकरणाची आठवण
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चार वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणात अवघ्या ६० दिवसांत सुनावणी पूर्ण झाली होती. या प्रकरणातील ६५ वर्षीय दोषीला न्यायालयाने तिहेरी फाशीची शिक्षा सुनावली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या जलद न्यायप्रक्रियेचा उल्लेख केला होता. मात्र, त्यानंतरही अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.