मुंबई तापली; पारा ३८ अंशांवर  संग्रहित छायाचित्र
मुंबई

Weather Update : मुंबई तापली; पारा ३८ अंशांवर

रविवारच्या सुट्टीच्या दिवशी फिरण्यासाठी किंवा कामासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना कडक उन्हाने भाजून काढले.

प्रतिनिधी

देवश्री भुजबळ

मुंबई : रविवारच्या सुट्टीच्या दिवशी फिरण्यासाठी किंवा कामासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना कडक उन्हाने भाजून काढले. कारण मुंबईचे तापमान चक्क ३८ अंशावर पोहचले होते. गेल्या १३ वर्षांतील ऑक्टोबरमधील हे दुसऱ्या क्रमांकाचे उच्चांकी तापमान ठरले आहे. यापूर्वी १७ ऑक्टोबर २०१५ रोजी ३८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीतून समोर आली आहे.

ऑक्टोबरच्या कडक उन्हाचा तडाखा मुंबईकरांना आठवड्याच्या अखेरीसही सहन करावा लागला. कमाल तापमानात झालेली वाढ कायम राहिली. रविवारी सांताक्रूझ वेधशाळेत ३८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा ४.९ अंशांनी अधिक होते.

मुंबईत उष्णतेच्या लाटेबाबत कोणताही इशारा जारी करण्यात आलेला नसला, तरी उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील २४ तासांच्या स्थानिक हवामान अंदाजानुसार, कमाल तापमान सुमारे ३७ अंश, तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

मुंबईसाठी ऑक्टोबरमधील उष्णता ही नवीन बाब नाही. मात्र, यंदा ऑक्टोबरच्या पहिल्या दहा दिवसांतच पावसाळ्यानंतरच्या उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थितीचा अनुभव मुंबईकरांना आला. मान्सूनचे लवकर झालेले निर्गमन आणि व्यापक स्वरूपातील ‘एल निनो’च्या हवामानविषयक परिस्थितीमुळे तापमानात वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याच काळात पावसाची तूटही नोंदवली आहे.

मुंबई विद्यापीठातील पर्यावरणशास्त्राच्या एका प्राध्यापकांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले, ‘ऑक्टोबरमध्ये मुंबईचे कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या आसपास जाणे नवीन नाही. मात्र, यंदा महिन्याच्या सुरुवातीलाच तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदवले जात आहे. याचे थेट कारण नैऋत्य मान्सूनचे लवकर झालेले निर्गमन हे आहे. मुंबईतून मान्सून माघारी फिरण्याची सर्वसाधारण तारीख १० ऑक्टोबरच्या आसपास असते. मात्र, यंदा ३ ऑक्टोबरलाच मान्सूनने माघार घेतली. त्यातच सप्टेंबरमध्ये पावसाचा मोठा खंड पडला. परिणामी, जमिनीच्या पृष्ठभागाचे तापमान वाढले.”

ते पुढे म्हणाले की, कमाल तापमानावर वाऱ्यांच्या दिशेचाही परिणाम होतो. ‘ईशान्येकडून वारे वाहत असताना तापमानात वाढ होते. याशिवाय, दुपारनंतर अरबी समुद्रावरील वाऱ्यांचा वेग मंदावल्यास उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती जाणवते. दिवसभरातील तापमान आधीच जास्त असल्याने त्याचा परिणाम अधिक तीव्रतेने जाणवतो.’

मुंबईचे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे संचालक बिक्रम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारपासून मुंबईतील कमाल तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे

  • सांताक्रूझ वेधशाळा : रविवारी ३८.० अंश सेल्सिअस तापमान; सरासरीपेक्षा ४.९ अंशांनी अधिक.

  • कुलाबा वेधशाळा : ३६.५ अंश सेल्सिअस तापमान; सरासरीपेक्षा ३.९ अंशांनी अधिक.

  • दिलासा कधी? : मंगळवारपासून तापमानात घट होण्याची शक्यता.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

CJP Protest : आंदोलन होणार तीव्र; झुरळांचा इशारा, ‘इंडिया’ आघाडीसह सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन

‘इंडिया’ आघाडीचा आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा; राहुल गांधींनी दिली माहिती

Delhi Protest : शांततापूर्ण आंदोलनांवर कारवाई नको; सर्वोच्च न्यायालयाची तंबी, मेट्रो, इंटरनेट सेवा पूर्ववत करा

दुष्काळग्रस्तांसाठी पुढील सहा ते आठ महिन्यांचे नियोजन करा; केंद्रीय पथकांसोबतच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

CJP Protest : मुंबईत आंदोलकांची धरपकड; अंजली दमानियांसह शेकडो आंदोलकांना घेतले ताब्यात