Mumbai : ‘चिंतामणी’च्या आगमन सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ 
मुंबई

Mumbai : ‘चिंतामणी’च्या आगमन सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ

चिंचपोकळी चिंतामणी गणपतीच्या आगमन मिरवणुकीसाठी शनिवारी जमलेल्या प्रचंड गर्दीचाही चोरट्यांनी गैरफायदा घेतला.

प्रतिनिधी

पूनम अपराज/मुंबई

चिंचपोकळी चिंतामणी गणपतीच्या आगमन मिरवणुकीसाठी शनिवारी जमलेल्या प्रचंड गर्दीचाही चोरट्यांनी गैरफायदा घेतला. या गर्दीत अनेक भाविकांचे सोन्याचे दागिने आणि महागडे मोबाईल फोन चोरीला गेले आहेत. या प्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत करी रोड येथील ज्योती निखिल राणे या आपल्या बहिणीसोबत गणपतीच्या सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी लालबाग परिसरात आल्या होत्या. दुपारी गर्दीत उभ्या असताना, एका अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे, सुमारे १ लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकारात राणे यांच्या मानेस दुखापत झाली. त्यानंतर त्यांनी काळाचौकी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

दुसऱ्या घटनेत १८ वर्षीय आदित्य अनंत सावंत याच्या गळ्यातील सुमारे १ लाख रुपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी चोरीला गेली. या घटनेत आदित्य सावंतलाही किरकोळ दुखापत झाली.

दरम्यान, आर्यन सागर गायकवाड हा मित्रांसह मिरवणुकीसाठी आला होता. दुपारी त्याच्या पॅन्टच्या खिशातून सुमारे ५० हजार रुपये किमतीचा निळ्या रंगाचा आयफोन-१२ चोरीला गेला. अर्जुन राजभर (२१) यानेही त्याच्या भावाचा काळ्या रंगाचा सुमारे ४० हजार रुपये किमतीचा आयफोन-११ करी रोड येथील अविघ्न इमारतीजवळून चोरीला गेल्याची तक्रार केली.

नरेंद्रसिंह बलजीतसिंह बाजवा यांनी सांगितले की, सायंकाळी सुमारे ५ वाजता त्यांच्या खिशातील सुमारे १ लाख रु. किंमतीचा आयफोन-१७ प्रो चोरीला गेला. इतर अनेक भाविकांचेही मोबाईल चोरीला गेल्याचे समोर आले आहे. चोरीला गेलेल्या मोबाईलमध्ये आयफोन-१७ प्रो, आयफोन-१७ प्रो मॅक्स, आयफोन-१७, आयफोन-१६, आयफोन-१५ प्लस, व्हिवो एक्स-३०० प्रो, मोटोरोला एज-६० प्रो आणि रेडमी ए-४ ५जी या महागड्या मोबाईलचा समावेश आहे.

या चोरीला गेलेल्या मोबाईलची एकूण किंमत ८.२७ लाख रुपये आहे. गर्दीचा फायदा घेत या चोऱ्या एखाद्या संघटित टोळीने केल्या आहेत का, याचा पोलीस तपास करीत आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : '२८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडा'; ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनानंतर अभिनेता इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस

Truecaller शिवाय कळणार कोण करतंय फोन? रिंग वाजताच स्क्रीनवर दिसणार नाव; १ नोव्हेंबरपासून नवा नियम

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या २४ विशेष फेऱ्या; १८ ते २२ ऑक्टोबरदरम्यान नागपूरसाठी विशेष गाड्या धावणार

मराठवाड्यात भूजलपातळीत घट; संभाजीनगरात १६९ टँकर सुरू

लग्नाची गोष्ट, पण यावेळी मुलींच्या नजरेतून! 'लग्न आणि बरंच काही' टीमच्या नवशक्तिसोबत खास गप्पा; पूजा म्हणते, 'लग्न करायचं, पण...'