मुंबई : मुंबईकरांना गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा लागून राहिलेल्या शहरातील तीन महत्त्वाच्या पुलांच्या कामांना अखेर गती मिळाली असून, सायन रेल्वे पूल, विद्याविहार रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) आणि गोरेगाव-दादासाहेब फाळके चित्रनगरीदरम्यानचा उड्डाणपूल ऑक्टोबरमध्ये वाहतुकीसाठी खुले करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मात्र, या तिन्ही प्रकल्पांच्या डेडलाइन यापूर्वी अनेकदा पुढे ढकलण्यात आल्याने यावेळी तरी प्रत्यक्षात पूल खुले होणार का, याकडे लक्ष लागले आहे.
तब्बल ११२ वर्षे जुना सायन रेल्वे पूल ऑगस्ट २०२४ पासून वाहतुकीसाठी बंद आहे. रेल्वे हद्दीतील या पुलाची पुनर्बाधणी मध्य रेल्वेकडून करण्यात येत असून, पुलाच्या जोडरस्त्यांचे काम मुंबई महापालिका रेल्वेच्या समन्वयाने करत आहे. हा पूल १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू करण्याचे लक्ष्य आहे. यापूर्वी मे आणि त्यानंतर ऑगस्ट अशी दोन वेळा डेडलाइन निश्चित करण्यात आली होती. मात्र दोन्ही वेळची डेडलाइन हुकली. मध्य रेल्वेने ५०० टन वजनाच्या पहिल्या स्टील गर्डरच्या डेक स्लॅबचे काँक्रीटीकरण २१ ऑगस्ट रोजी, तर दुसऱ्या गर्डरचे काँक्रीटीकरण २९ ऑगस्ट रोजी पूर्ण केले. त्यानंतरच महापालिकेला संबंधित कामे सुरू करता आली.
सायन पूल बंद असल्यामुळे परिसरातील तसेच दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होत आहे. टिळक पुलाचे काम सुरू असून, एल्फिन्स्टन पुलाचेही काम सुरू असल्याने पर्यायी मार्गांवर ताण वाढला आहे. विद्याविहार पूर्व- पश्चिम जोडणाऱ्या पुलाचे कामही गेल्या आठ वर्षांपासून सुरू आहे. या पुलाच्या बांधकामासाठी मे २०१८ मध्ये कायदिश देण्यात आले आणि डिसेंबर २०२४ मध्ये तो वाहतुकीसाठी खुला करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते.
अशी हुकली डेडलाइन
सायन पूल : मे २०२६ ऑगस्ट २०२६ ऑक्टोबर २०२६
विद्याविहार आरओबी : डिसेंबर २०२४ ३१ मे २०२६ जून २०२६ ऑक्टोबर २०२६
जीएम एल आर उड्डाणपूल : १५ मे २०२६ १५ ऑक्टोबर २०२६
गोरेगाव-चित्रनगरी उड्डाणपूल अंतिम टप्प्यात !
पश्चिम उपनगरातील गोरेगाव ते दादासाहेब फाळके चित्रनगरीदरम्यानचा १.२६ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूलही आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (जीएमएलआर) प्रकल्पातील हा महत्त्वाचा भाग असून, १५ ऑक्टोबरपर्यंत तो वाहतुकीसाठी खुला करण्याचे लक्ष्य आहे. १२.२ किलोमीटर लांबीच्या जीएम एल आर प्रकल्पामुळे मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. महापालिकेच्या अंदाजानुसार, पूर्व-पश्चिम उपनगरांमधील प्रवासाचा कालावधी सुमारे ७५ मिनिटांवरून २५ मिनिटांवर येणार आहे.
डेडलाइनचा खेळ थांबणार कधी?
तीनही पुलांच्या कामांमुळे मुंबईकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता नव्या डेडलाइननुसार कामे पूर्ण करून पूल प्रत्यक्षात वाहतुकीसाठी खुले होणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. विशेषतः सायन आणि विद्याविहार पुलांच्या बाबतीत यापूर्वी अनेकदा मुदती बदलल्याने प्रशासनाच्या आश्वासनांकडे मुंबईकर सावधपणे पाहत आहेत.