मुंबई : व्हीआयपी व्यक्तीच्या वाहनाला मार्ग करून देताना एका वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने सायकलवरून ओझं घेऊन जाणाऱ्या व्यक्तीची सायकल उचलून बाजूला फेकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकाराचा व्हिडीओ शिवसेनेचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनीही एक्सवर शेअर केला आहे. अशा प्रकारचं वर्तन अस्वीकार्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच, प्रत्येक नागरिकाला सन्मानाने वागणूक मिळायला हवी, असं सांगत त्यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, व्हिडीओमध्ये व्हीआयपी वाहनासाठी रस्त्यावरील बॅरिकेड्स हटवले जात असल्याचं आणि त्यानंतर सामान्य वाहनांना मात्र त्याच मार्गाने जाण्यापासून रोखलं जात असल्याचं दिसत आहे.
व्हायरल VIDEO मध्ये काय दिसतं?
व्हायरल व्हिडीओमध्ये सुरुवातीला वाहतूक पोलीस कर्मचारी रस्त्याच्या मधोमध असलेले पिवळे बॅरिकेड्स हटवण्याच्या तयारीत असल्याचं दिसतं. याचवेळी तिथून सायकलवर ओझं घेऊन जाणाऱ्या व्यक्तीची सायकल तो पोलीस कर्मचारी बाजूला फेकताना दिसतो. त्यानंतर तो रस्त्यावरील बॅरिकेड्स पूर्णपणे बाजूला करतो आणि एका व्हीआयपी वाहनाला यू-टर्न घेऊन पुढे जाण्यासाठी मार्ग करून देतो. या वाहनाच्या मागून पोलिसांचं वाहनही पुढे जातं. मात्र, व्हीआयपी वाहनांचा ताफा गेल्यानंतर मागून आलेल्या इतर प्रवासी वाहनांना त्याच मार्गाने जाण्याची परवानगी दिली जात नाही. चालकांना दुसऱ्या मार्गाने जाण्याचा इशारा करत वाहतूक पोलीस त्यांना थांबवताना व्हिडीओमध्ये दिसतो.
सोशल मीडियावर संताप
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या वाहनासाठी सर्वसामान्य नागरिकाला अशा प्रकारे बाजूला करणं योग्य आहे का, असा सवाल नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
विशेषतः सायकलवरून सामान वाहून नेणाऱ्या कामगाराशी करण्यात आलेल्या कथित वर्तनावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. वाहतुकीचं नियमन आवश्यक असलं तरी प्रत्येक नागरिकाशी सन्मानाने वागणं तितकंच महत्त्वाचं असल्याचं मत सोशल मीडियावर व्यक्त केलं जात आहे.
मिलिंद देवरांनी कारवाईची केली मागणी
शिवसेनेचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनीही हा व्हिडीओ शेअर करत मुंबई पोलिसांना टॅग केले आहे. संबंधित वाहनातील व्हीआयपी व्यक्ती कोणीही असली तरी काम करणाऱ्या सायकलस्वाराला आणि त्याच्या सायकलला अशा प्रकारे ढकलणं योग्य नाही, असं म्हटलं आहे. तसेच, प्रत्येक नागरिकाला सन्मानाने वागणूक मिळायला हवी, असं सांगत संबंधित पोलिस कर्मचाऱ्याच्या वर्तनाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया
हा व्हिडीओ एक्स, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि रेडिटसह विविध प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. अनेकांनी देशातील कथित व्हीआयपी संस्कृतीवर टीका करत नियम सर्वांसाठी समान असायला हवेत, अशी भूमिका मांडली आहे.