मुंबई : आगामी परीक्षांचे हॉलतिकीट तयार करण्यासाठी अपार आयडी अनिवार्य करण्यात आले आहे. अपार आयडीशिवाय विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट तयार होणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे.
त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अपार आयडी तयार केलेला नाही किंवा अपार आयडी, एबीसी आयडी लिंकिंग अथवा आधार प्रमाणीकरणासंदर्भात अडचणी येत आहेत, त्यांनी या समस्यांचे तातडीने निराकरण करून घ्यावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे. १९ व २० ऑगस्टला विशेष सुविधा शिबिर राबविण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या या अडचणींचे निराकरण करण्यासाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांच्या समन्वयाने मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील अल्केश दिनेश मोदी इन्स्टिट्यूट फॉर फायनान्शियल अँड मॅनेजमेंट स्टडीज येथे विशेष आधार सुविधा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर १९ व २० ऑगस्ट सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
अपार आयडी तयार करणे, अपार आयडी आणि शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट्स (एबीसी) आयडी लिंक करणे, आधार प्रमाणीकरण, आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकातील तफावत, नाव अथवा जन्मतारखेतील तफावत तसेच आधारशी संबंधित इतर समस्यांचे निराकरण या शिबिरामध्ये करण्यात येणार आहे.
अपार आयडी हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी, शैक्षणिक क्रेडिट्स आणि परीक्षा प्रक्रियेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.