Mumbai : विद्याविहार रेल्वे स्थानकावरील उड्डाणपूल उद्यापासून सेवेत; ध्वनिरोधक बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात (Photo-X/@mybmc)
मुंबई

Mumbai : विद्याविहार रेल्वे स्थानकावरील उड्डाणपूल उद्यापासून सेवेत; ध्वनिरोधक बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात

घाटकोपर परिसरातील पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडणाऱ्या विद्याविहार रेल्वे स्थानकावरील मुख्य उड्डाणपुलाची ध्वनीरोधक वगळता सर्व प्रमुख कामे पूर्ण झाली आहेत.

Swapnil S

मुंबई : घाटकोपर परिसरातील पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडणाऱ्या विद्याविहार रेल्वे स्थानकावरील मुख्य उड्डाणपुलाची ध्वनीरोधक वगळता सर्व प्रमुख कामे पूर्ण झाली आहेत. उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने अंतिम कामांना वेग देण्यात आला आहे. १० ऑक्टोबरपर्यंत हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी सज्ज होईल, अशा पद्धतीने कामाची अंतिम पूर्तता करण्यात येत आहे.

अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांसमवेत प्रकल्पस्थळास भेट देऊन उड्डाणपूल तसेच परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि सुरक्षित राहण्यासाठी महानगरपालिका व वाहतूक पोलिसांनी परस्पर समन्वयाने आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडणारा हा उड्डाणपूल दोन मार्गिकांचा असून, त्याची एकूण लांबी ६५० मीटर आहे. यामध्ये रेल्वे रुळांवर १०० मीटर लांबीचा पूल, पूर्व बाजूस २२० मीटर आणि पश्चिम बाजूस ३३० मीटर लांबीचे पोहोच मार्ग बांधण्यात आले आहेत. उड्डाणपुलावरून विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या पदपथांवर जाण्यासाठी जोडमार्गाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, दोन्ही बाजूंच्या रेल्वे तिकीट खिडकी कक्ष, स्थानक मास्तर कार्यालय आणि जिन्यांची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. रेल्वे हद्दीत जिन्याद्वारे पादचारी मार्ग उपरस्त्याला जोडण्यात आला आहे. या सर्व कामांची बांगर यांनी पाहणी केली.

सद्यस्थितीत मुख्य उड्डाणपुलाची सर्व प्रमुख कामे पूर्ण झाली असून रंगकाम, दिवाबत्ती व्यवस्था, रस्ता तसेच इतर आवश्यक अंतिम कामे पूर्ण करण्यात आली आहेत. परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ध्वनिरोधक बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : गुरुवारी, शुक्रवारी पाणीबाणी; धारावी, वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी, भांडुपमध्ये पाणी नाही

अतिवेगाचे १३ बळी; राज्यात विविध अपघातांत २८ जखमी, १० गंभीर

नेपाळला १५ हजार कोटींच्या मदतीचे पॅकेज; पंतप्रधान मोदी-बालेन शाह यांची आठ करारांवर स्वाक्षरी

अर्थव्यवस्थेची भरभराट, राहुलचा जळफळाट

आजचे राशिभविष्य, २४ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत