मुंबई : रेल्वे स्थानकाबाहेर टॅक्सी पकडताना अनेकदा प्रवाशांना भाड्यावरून टॅक्सीचालकांसोबत हुज्जत घालावी लागते. काही वेळा मीटरप्रमाणे भाडे आकारण्याऐवजी जादा पैसेही मागितले जातात. मात्र, आता प्रवाशांची ही कटकट कमी होण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेने मुंबईतील सहा प्रमुख स्थानकांवर प्रीपेड टॅक्सी काउंटर सुरू करण्याची योजना आखली आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना टॅक्सीत बसण्यापूर्वीच भाडे निश्चित करता येणार असून, मनमानी भाडेवसुलीला आळा बसण्याची अपेक्षा आहे.
पश्चिम रेल्वेच्या कोणत्या स्थानकांवर मिळणार सुविधा?
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल टर्मिनस, दादर, वांद्रे टर्मिनस, बोरिवली, विरार आणि पालघर या सहा स्थानकांवर प्रीपेड टॅक्सी काउंटर सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. या स्थानकांवर लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी येतात. स्थानकातून बाहेर पडल्यानंतर इच्छित स्थळी जाण्यासाठी अनेक जण टॅक्सीचा पर्याय निवडतात. मात्र, काही टॅक्सीचालक मीटरप्रमाणे भाडे आकारण्यास नकार देतात किंवा प्रवाशांकडून जास्त पैसे मागतात, अशा तक्रारी वारंवार समोर येतात. विशेषतः मुंबईतील रस्ते आणि टॅक्सीचे दर माहीत नसलेल्या बाहेरगावच्या प्रवाशांना याचा अधिक त्रास होतो. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सामानासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो.
विमानतळाप्रमाणेच प्रीपेड टॅक्सीची व्यवस्था
प्रस्तावित प्रीपेड टॅक्सी सेवा मुंबई विमानतळावरील व्यवस्थेच्या धर्तीवर सुरू करण्याचे पश्चिम रेल्वेचे नियोजन आहे. या व्यवस्थेमुळे प्रवाशांना टॅक्सीत बसण्यापूर्वीच प्रवासाचे भाडे भरता येईल. त्यामुळे भाड्यावरून होणारे वाद आणि प्रवाशांची होणारी गैरसोय कमी होण्यास मदत होईल.
या व्यवस्थेनुसार, प्रवाशांना स्थानकाबाहेरील प्रीपेड काउंटरवर जाऊन इच्छित ठिकाणाचा पत्ता सांगावा लागेल. त्यानंतर संगणकीय प्रणालीद्वारे प्रवासाचे अंतर आणि लागू भाडेदरांनुसार भाडे निश्चित केले जाईल. प्रवाशांनी पैसे भरल्यानंतर त्यांना पावती दिली जाईल. या पावतीच्या आधारे प्रवाशांना निश्चित केलेल्या रांगेतून टॅक्सी घेता येईल. भाड्याबाबत काही तक्रार किंवा वाद झाल्यास संपर्क साधण्यासाठी आवश्यक माहितीही पावतीवर दिली जाणार आहे.
काळी-पिवळी टॅक्सी आणि ॲप कॅबसाठी स्वतंत्र रांगा
स्थानक परिसरातील वाहतूक आणि प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी काळी-पिवळी टॅक्सी आणि ॲपआधारित कॅब सेवांसाठी स्वतंत्र रांगा तयार करण्याचाही विचार सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना आपल्या गरजेनुसार वाहन निवडणे सोपे होईल. तसेच स्थानकाबाहेरील वाहनांची गर्दी कमी करण्यासही मदत होऊ शकते.
टॅक्सीचालकांना अतिरिक्त प्रोत्साहन देण्याचा विचार
प्रीपेड टॅक्सी योजनेला चालकांकडून चांगला प्रतिसाद मिळावा, यासाठी त्यांना आर्थिक प्रोत्साहन देण्याबाबतही चर्चा सुरू आहे. प्रवासाचे अंतर आणि लागू भाडेदरांनुसार निश्चित होणाऱ्या रकमेव्यतिरिक्त चालकांना ठरावीक टक्के अतिरिक्त रक्कम देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यासंदर्भात पश्चिम रेल्वेकडून टॅक्सी संघटनांशी चर्चा केली जात आहे.
निविदा प्रक्रिया राबवणार
प्रीपेड टॅक्सी काउंटर उभारण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यातील योजनेच्या यशाचा आढावा घेतल्यानंतर अन्य स्थानकांवरही या सुविधेचा विस्तार करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच वैध परवाने नसलेल्या टॅक्सी स्थानक परिसरात येऊ नयेत, यासाठी वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (RTO) मदत घेतली जाणार आहे.
दरम्यान, मध्य रेल्वेच्या मुंबईतील उपनगरीय स्थानकांवर अशी प्रीपेड टॅक्सी सुविधा सुरू करण्याची सध्या तातडीची योजना नाही. मात्र, मध्य रेल्वेकडून नागपूर आणि पुणे येथे यापूर्वीपासून प्रीपेड टॅक्सी सेवा चालवली जात आहे.