मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने मविआच्या नेत्यांना विश्वासात न घेता परस्पर तीन जागांवरील उमेदवार जाहीर केल्याने आघाडीतील इतर पक्ष नाराज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची शनिवारी बैठक पार पडली. मात्र यातून कोणताच तोडगा न निघाल्याने, रविवारी पुन्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चेची फेरी पार पडणार आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ६ ऑक्टोबर आहे. मात्र, या दरम्यान काँग्रेसने परस्पर ३ उमेदवारांची नावे जाहीर केल्याने मविआतील इतर पक्षांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. मित्रपक्षांना विचारात न घेता नावे जाहीर केलीच कशी? असा सवाल मित्रपक्षांनी उपस्थित केला होता.
मित्र पक्षांची नाराजी लक्षात घेऊन मविआच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक ग्रैंड हयात हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि शिवसेना उबाठाकडून खासदार संजय राऊत हे उपस्थित होते. या बैठकीमधे ५ जागांच्या अनुषंगाने चर्चा पार पडल्याचे समजते. मात्र महाविकास आघाडीच्या या बैठकीत जागांबाबत तोडगा निघाला नसल्याचे समजते. महाविकास आघाडीची रविवारी ४ ऑक्टोबरला पुन्हा चर्चेची फेरी पार पडणार आहे.
काँग्रेसने अमरावती शिक्षक, नागपूर पदवीधर, पुणे शिक्षक या तीन मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. उबाठाला अमरावती शिक्षक मतदारसंघाची जागा हवी आहे. तर औरंगाबाद पदवीधरच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शप) आणि उबाठा यांनी दावा केला आहे. अमरावतीसाठी काँग्रेसने उमेदवार जाहीर केला तरी उबाठाने या जागेवरचा दावा कायम ठेवला असून महिनाभर आधीच त्यांनी पक्षाचा उमेदवार जाहीर केला होता. त्यामुळे रविवारी संध्याकाळी पुन्हा एकदा बैठक घेऊन अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे घोषित उमेदवार
दरम्यान, काँग्रेसने नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी अभिजीत वंजारी यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे पुणे पदवीधर मतदारसंघासाठी जयंत आसगावकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघामधून आदिती पोहोरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
पुण्याची जागा भाजपला
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना तिन्ही मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावाची यादी सुपूर्द केली आहे. पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा भाजपला मिळताच पक्षांतर्गत हालचालींना प्रचंड वेग आला आहे. भाजपने प्रत्येक जागेसाठी ५ संभाव्य उमेदवारांचे पर्याय ठेवले असून, ३ मतदारसंघांसाठी एकूण १५ नावं केंद्रीय नेतृत्वाकडे सोपवण्यात आली आहेत.