मुंबई : वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्र ते नेहरू तारांगणदरम्यान मुंबई मनपातर्फे सुरू असलेल्या उड्डाणपूल व सब वे प्रकल्पाचे काम ३१ जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
बांगर यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आणि कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. उर्वरित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी कामाचा वेग वाढवावा, असे निर्देश त्यांनी दिले.
नेहरू विज्ञान केंद्राच्या बाजूला १२०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य पायलिंगचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी पोर्टल बीम आणि गर्डर निर्मितीचे काम प्रकल्पस्थळी तसेच निर्मिती केंद्रात सुरू आहे. एकूण १४ पैकी १४ पोर्टल बीमचे काम पूर्ण झाले असून, १८ गर्डर स्पॅनपैकी १७ गर्डर स्पॅनचे काम पूर्ण झाले आहे. पोर्टल बीम आणि गर्डर स्पॅन उभारणीचे कामही वेगाने सुरू आहे. आतापर्यंत १४ पैकी १३ पोर्टल बीमची उभारणी पूर्ण झाली आहे.
१५ मिनिटांचा वेळ वाचणार!
या उड्डाणपुलामुळे वरळी परिसरातील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. प्रस्तावित उड्डाणपुलामुळे प्रवासाचा वेळ सुमारे १५ मिनिटांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. ई. मोझेस मार्गावरून ॲनी बेझंट मार्ग तसेच धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गाकडे थेट जाण्यासाठी या पुलामुळे अधिक सोपा आणि जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे.