मुंबई : मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चुन काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. मात्र, शिवडीतील ठोकरशी जीवराज रोडवरील अवघ्या दोन महिन्यांपूर्वी पूर्ण झालेला नवा कोरा सिमेंट काँक्रीट रस्ता सेवा वाहिन्यांच्या कामासाठी खोदण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात रस्ते खोदकामावर निर्बंध असतानाही टाटा कंपनीला खोदकामाची परवानगी देण्यात आल्याने मुंबई महापालिकेच्या नियोजनावर आणि कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान, स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ यांनी या प्रकरणाची तक्रार पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मुंबई महापालिकेने पावसाळ्यात नवीन काँक्रीटीकरणाची कामे थांबवण्याबरोबरच अत्यावश्यक परिस्थिती वगळता काँक्रिट रस्ते खोदण्यास परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शिवडीतील प्रभाग क्रमांक २०२ मधील ठोकरशी जीवराज रोडवर सेलिस्टिया पार्किंगसमोरील नव्याने तयार झालेला रस्ता खोदण्यात आला. या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाला २०२४ मध्ये मंजुरी मिळाली होती. २०२५ आणि २०२६ मध्ये टप्प्याटप्याने काम पूर्ण होऊन मार्च २०२६ मध्ये रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. नियमानुसार रस्ता काँक्रीटीकरण सुरू करण्यापूर्वी सर्व
सेवा वाहिनीधारक कंपन्यांना आवश्यक कामे पूर्ण करण्यासाठी पूर्वसूचना दिली जाते. त्यानंतरही काम पूर्ण झाल्यानंतर दोन महिन्यांतच त्याच रस्त्यावर खोदकामाची परवानगी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
चौकशी करून कठोर कारवाई करा !
या कामांत नियमांचे उल्लंघन झाले असून या प्रकरणात सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केल्याचे स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ यांनी सांगितले.
कोट्यवधी रुपयांचा चुराडा
मुंबईत एकूण २,१७५ रस्त्यांचे सुमारे ७१२ किलोमीटर लांबीचे काँक्रीटीकरण सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील ७३३ रस्त्यांपैकी सुमारे ८९ टक्के काम पूर्ण झाले असून, दुसऱ्या टप्प्यातील १,४४२ रस्त्यांपैकी सुमारे ७३ टक्के काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, अशा प्रकारे नव्याने तयार झालेले रस्ते पुन्हा खोदले जात असल्याने कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक निधीचा चुराडा केला जात असल्याची टीका होत आहे.