मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात रुग्ण आणि नातेवाईक यांच्यातील वाद तसेच रुग्णालयावर पडणारा ताण दूर करण्यासाठी आता ‘एक रुग्ण, एक नातेवाईक’ पद्धत अंमलात आणणे गरजेचे आहे. यासाठी ही पद्धती लागू करावी आणि ‘अभ्यागत प्रवेशिका प्रणाली’ सुरू करावी, अशी सूचना मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली आहे. त्यासंदर्भात महापौरांनी महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहिले आहे.
रुग्णालयातील वाढती गर्दी नियंत्रित करणे, स्वच्छता राखणे आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कामासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे हा या प्रयत्नांचा मुख्य उद्देश आहे. प्रायोगिक तत्त्वावर सर्वप्रथम केईएम, शीव (सायन) आणि नायर या प्रमुख रुग्णालयांमध्ये ही पद्धती तातडीने लागू करता येईल, अशी विनंती महापौरांनी केली आहे.
रुग्णालयातील गर्दी व्यवस्थापनामुळे रुग्णसेवेचा तसेच स्वच्छतेचा दर्जा सुधारेल, कचरा कमी होईल आणि परिसर निर्जंतुक राखण्यास मदत होईल. तसेच, डॉक्टर्स आणि परिचारिकांना रुग्णांकडे अधिक चांगल्या प्रकारे लक्ष देता येईल.
मुंबईकरांना उच्च दर्जाची आरोग्य सुविधा देण्यासाठी ही पद्धती अत्यंत प्रभावी ठरेल, असे महापौर रितू तावडे यांनी नमूद केले आहे.
या नियमांमुळे काही फायदे अपेक्षित आहेत, जसे की, (१) रुग्णालयाच्या मार्गिका (कॉरिडोअर) आणि वॉर्डमधील गर्दी लक्षणीयरीत्या कमी होईल. (२) गर्दीवर नियंत्रण आल्यामुळे रुग्णालयातील स्वच्छतेचा दर्जा सुधारेल. (३) रुग्णांना शांत आणि संसर्गमुक्त वातावरण मिळेल. (४) नागरिकांमध्ये संवेदनशील सार्वजनिक ठिकाणी पाळावयाची नागरी शिस्त वाढीस लागेल.
अशा आहेत महापौरांच्या सूचना
‘एक रुग्ण, एक नातेवाईक’ पद्धत : रुग्णालयात दाखल असलेल्या प्रत्येक रुग्णासोबत विभाग (वॉर्ड) मध्ये एकाच नातेवाईकाला थांबण्याची परवानगी असावी. यामुळे विनाकारण होणारी गर्दी टळेल आणि डॉक्टर्स व परिचारिकांना रुग्णांवर उपचार करणे सोपे होईल.
अभ्यागत प्रवेशिका प्रणाली : रुग्णालयांच्या प्रवेशद्वारावरच आधुनिक अशी अभ्यागत प्रवेशिका प्रणाली सुरू करण्यात यावी. सुरक्षारक्षक या प्रवेशिकांची तपासणी करतील. त्यातही, डिजिटल प्रणाली राबविल्यास सुरक्षेचा प्रश्न सुटेल आणि विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींना आळा बसेल.
अत्यवस्थ रुग्णांसाठी विशेष सवलत!
अतिदक्षता विभागात (आयसीयू) असलेल्या किंवा प्रकृती अत्यंत गंभीर असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना मानवतावादी दृष्टिकोनातून एकापेक्षा जास्त प्रवेशिका देण्याची विशेष सवलत असेल. याचा निर्णय घेण्याचे अधिकार रुग्णालय प्रशासनाला राहतील.