प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

रेल्वेला उपरती! गर्दी सामावून घेण्यासाठी घेतला महत्त्वाचा निर्णय

रेल्वे बोर्डाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अतिरिक्त २,५०० जनरल वर्गाचे डबे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे रेल्वे व मेल-एक्स्प्रेसमधून वार्षिक अतिरिक्त १८ कोटी प्रवाशांची सोय होणार आहे.

Swapnil S

मुंबई : रेल्वेने लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांत दुसऱ्या वर्गाचे व जनरल डब्यांची संख्या कमी करून ‘वातानुकूलित’ (एसी) डब्यांची संख्या वाढवल्याने दुसऱ्या वर्गाच्या (स्लीपर) डब्यांमध्ये प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याबाबतचे चित्रीकरण सोशल मीडियावरून व्हायरल होऊ लागल्याने रेल्वेला प्रवाशांच्या टीकेचे धनी व्हावे लागले. त्यामुळे अखेर रेल्वेला उपरती आली असून, रेल्वे खात्याने द्वितीय शयनयान (स्लीपर) व जनरल डबे वाढवण्याचा निर्णय आता घेतला आहे.

रेल्वे बोर्डाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अतिरिक्त २,५०० जनरल वर्गाचे डबे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे रेल्वे व मेल-एक्स्प्रेसमधून वार्षिक अतिरिक्त १८ कोटी प्रवाशांची सोय होणार आहे.

रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये दोन जनरल डबे असतात. ती संख्या चारवर नेली जाणार आहे. प्रत्येक डब्यात १५० ते २०० प्रवासी बसतील, अशी त्याची रचना केली आहे. त्यातून रोज ५ लाख प्रवाशांची सोय होऊ शकेल. मेल-एक्स्प्रेसची प्रवासी क्षमता वाढवण्याची ही योजना आहे. त्यामुळे दरवर्षी अतिरिक्त १८ कोटी प्रवाशांची सोय होणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात २,५०० डबे तयार करण्यात येणार आहेत. त्यात १,३७७ डबे हे शयनयान (स्लीपर) वर्गाचे असतील.

प्रवासी सोयीसुविधा वाढवण्याचा प्रयत्न

डब्यांचे उत्पादन वाढवतानाच भारतीय रेल्वेने प्रवाशांना प्रवासाचा आनंद देण्याचे ठरवले आहे. यासाठी रेल्वेगाड्यांमध्ये अधिकाधिक आधुनिक सोयीसुविधा पुरवण्याचा प्रयत्न रेल्वेकडून सुरू आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकारक व आरामदायी होऊ शकतो, असे पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले.

रेल्वेची उत्पादन क्षमता वाढली

रेल्वेने आपली उत्पादन क्षमता वाढवली आहे. २०१४-१५ मध्ये रेल्वे दरवर्षी ५५५ एलएचबी कोच बनवत होती. २०२३-२४ मध्ये रेल्वेने ७,१५१ डबे बनवण्याचे टार्गेट ठेवले होते, तर २०२४-२५ मध्ये रेल्वेने ८,६९२ डबे बांधणीचे लक्ष्य ठेवले आहे. अमृत भारत व वंदे भारत ट्रेनअंतर्गत ही बांधणी केली जाईल.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक