संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात शिकारीचा रक्तरंजित थरार! गोळी लागून एकाचा मृत्यू, दोघे जखमी, मृतदेहाची परस्पर लावली विल्हेवाट  संग्रहित छायाचित्र
मुंबई

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात शिकारीचा रक्तरंजित थरार! गोळी लागून एकाचा मृत्यू, दोघे जखमी, मृतदेहाची परस्पर लावली विल्हेवाट

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बेकायदा घुसखोरी करून रानडुकरांच्या शिकारीसाठी गेलेल्या पथकातील एका व्यक्तीचा गोळी लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Swapnil S

भाईंंदर : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बेकायदा घुसखोरी करून रानडुकरांच्या शिकारीसाठी गेलेल्या पथकातील एका व्यक्तीचा गोळी लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेत अन्य दोघे जण जखमी झाले असून, त्यांच्यावर काशीगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, घटनेनंतर मृतदेहाचे शवविच्छेदन न करता आणि पोलिसांना माहिती न देता पहाटेच अंत्यसंस्कार उरकण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मृत्यूचे खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरसह चार ते पाच जणांना काशीगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चेना गाव परिसरातील पाच ते सहा जण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रानडुकरांच्या शिकारीसाठी गेले होते. बंदुका, छर्रे आणि अन्य साहित्य त्यांच्याकडे होते. मध्यरात्री बॅटरीच्या प्रकाशात शिकार टिपताना अंधारात प्राण्याचे डोळे समजून एका दिशेने गोळीबार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या गोळीबारात विजय सुखरू सापटे (वय ६०) यांच्या छातीत गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सापटे हे मनपात सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. या घटनेत कुणाल शेलार आणि कल्पेश ढगळा हे दोघेही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी एकाच्या मांडीला, तर दुसऱ्याच्या खांद्याला गोळी लागल्याचे सांगितले जात आहे. दोघांवर काशीगाव येथील आशिष रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पथकासोबत मृत व्यक्तीचा एक अल्पवयीन मुलगाही असल्याची माहिती समोर आली असून, त्याबाबत अधिक तपास सुरू आहे.

या घटनेची माहिती एका समाजसेवकाने प्रशासनाला दिली. सुरुवातीला जखमी व्यक्तींनी मासेमारी करताना स्फोटकाचा स्फोट होऊन अंगात छर्रे घुसल्याने दुखापत झाल्याचे सांगितल्याची माहिती आहे. मात्र, पोलिसांच्या चौकशीनंतर शिकारीदरम्यान गोळीबार झाल्याची बाब समोर आल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता तेथे रक्ताचे डाग आढळल्याची माहिती आहे. पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली.

गोळीमुळे मृत्यू झालेल्या विजय सापटे यांच्या मृत्यूची माहिती पोलिसांना न देता आणि शवविच्छेदन न करता मृतदेहावर पहाटेच अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा आरोप आहे. मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय पोलिसांना आहे. संबंधित खासगी डॉक्टरांनी सापटे यांचा मृत्यू घरी हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे नमूद करणारे प्रमाणपत्र दिल्याची माहिती हाती आली आहे. या प्रकरणी संबंधित डॉक्टरसह चार ते पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, प्रमाणपत्र कसे देण्यात आले, मृत्यूची माहिती का लपविण्यात आली आणि अंत्यसंस्काराची घाई का करण्यात आली, याचा सखोल तपास सुरू आहे.

एसएनजीपीकडून स्वतंत्र गुन्हा दाखल होणार

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मीरा-भाईंदर गुन्हे प्रकटीकरण शाखा-१ आणि काशीगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Uddhav Thackeray Dussehra Rally : सत्ता परिवर्तनासाठी सज्ज व्हा, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचे आवाहन

Eknath Shinde Dussehra Rally: भाषणांपेक्षा प्रत्यक्ष कामावर विश्वास; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावले

बड्या व्यक्तीच्या हत्येचा होता कट; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा खुलासा

राष्ट्रीय हितासाठी एकत्र यावे; पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

आंदोलनांमुळे फुटीचा धोका - सरसंघचालक; विजयादशमी महोत्सवात केले शस्त्रपूजन