मुंबई : एसआरएच्या संक्रमण शिबिराचा गैरवापर करणे विकासकाला भोवले आहे. संक्रमण शिबिराचा अनधिकृत वापर केल्याने संबंधित विकासकावर एमआरटीपी अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच या विकासकाकडून सदनिका ताब्यात घेण्याची प्रकिया एसआरएने सुरू केली आहे.
विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ मधील विनियम ३३ (११) अंतर्गत झोपडी विरहित क्षेत्रावर कायमस्वरुपी संक्रमण शिबिर सदनिका बांधण्याचे प्रावधान आहे. त्या अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या कायमस्वरुपी संक्रमण शिबिर सदनिका भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यावर शिवशाही पुनर्वसन प्रकल्प या प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात येतात. या सदनिकांचा वापर विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ मधील विनियम ३३ (१०) अंतर्गत झोपडपट्टी खालील क्षेत्रावर राबविण्यात येणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामधील झोपडीधारकांना तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित करण्यासाठी वापरण्यात येतात. झोपडीधारकांना अशाप्रकारे तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित केल्यानंतर मोकळया होणाऱ्या झोपडी खालील क्षेत्रावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना मधील इमारतीचे बांधकाम करण्यात येते. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ मधील विनियम ३३ (११) अंतर्गत आजतायागत एकूण ५२२ योजनामध्ये ३२ हजार ३३७ संक्रमण शिबीर सदनिकांचे बांधकाम प्रस्तावित असून त्यापैकी ६ हजार ६०४ सदनिकांचे हस्तांतरण करण्यात आले आहे.
मात्र या संक्रमण शिबीर सदनिकांचा विकासक गैरवापर करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यास अनुसरुन मुख्यमंत्र्यांनी सर्व संक्रमण शिबिर सदनिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. त्या अनुषांगाने ५२२ योजनामधील ३२ हजार ३३७ कायमस्वरुपी संक्रमण शिबिर सदनिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातील एकूण ८ योजनामधील २५२ सदनिका हस्तांतरित न करता विकासक अनधिकृतपणे वापर करित असल्याचे दिसून आले. या प्रकरणामध्ये विकासकावर एमआरटीपी कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्यात आली आहे. या २५२ सदनिकांपैकी १४९ सदनिका प्राधिकरणाने ताब्यात घेतल्या असून उर्वरित १०३ सदनिका ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
अनधिकृतपणे वापर
३२ हजार ३३७ कायमस्वरुपी संक्रमण शिबिर सदनिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातील ८ योजनामधील २५२ सदनिका हस्तांतरित न करता विकासक अनधिकृतपणे वापर करत असल्याचे दिसून आले.