मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या युवा नेत्यांनी शुक्रवारी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात घरकाम करणाऱ्या महिलांसाठी १५०० रुपयांचा ‘स्वाभिमान निधी’, तसेच तरुणांना २५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत स्वयंरोजगार सहाय्यता निधी, तसेच अन्य अनेक आश्वासने देण्यात आली आहेत.
शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना भवनात संयुक्त पत्रकार परिषद घेऊन, मुंबईतील विकासकामांबाबत नवे संकल्प मांडणारा ‘डिजिटल जाहीरनामा’ प्रसिद्ध केला.
आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले की, ७०० स्क्वेअर फूटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी दिली जाईल. कष्टकरी मुंबईकरांसाठी फक्त १० रुपयांत नाश्ता आणि जेवण देणारे ‘मास किचन’, लहान मुलांसाठी दर्जेदार पाळणाघरे, तसेच दर दोन किलोमीटरवर महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्यात येतील. तसेच १०० युनिटपर्यंत वीज मोफत, पाण्याचे दर स्थिर ठेवले जातील. तसेच मुंबईतील प्रत्येक वॉर्डात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, अत्याधुनिक व्यायामशाळा आणि जुन्या व्यायामशाळांची दुरुस्ती करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच महापालिकांच्या शाळांमध्ये ज्युनियर कॉलेजेस सुरू करून मराठी भाषा अनिवार्य केली जाईल. मुंबईकरांसाठी मोकळे फुटपाथ, क्लायमेट अॅक्शन प्लान, पाळीव प्राण्यांसाठी पेट पार्क आणि ॲम्ब्युलन्स, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने देशातील सर्वात मोठे ग्रंथालय उभारण्याचाही निर्धार ठाकरे बंधूंनी व्यक्त केला.
मुंबई मराठी माणसाच्या हातातच राहिली पाहिजे. तन-मन आपल्याकडे आणि धन त्यांच्याकडे आहे, असे आदित्य यांनी सांगत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. मुंबईची जमीन मुंबईकरांचीच असावी, बिल्डर्सच्या ताब्यात नाही. पुढील पाच वर्षांत १ लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट असल्याची घोषणा दोघांनीही एकत्रित केली. हे प्रेझेंटेशन आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केले जाणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक सुधारणा करून लवकरच मुंबईकरांसाठीचा अधिकृत 'वचननामा' जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तिकीट दरवाढ कमी करून रुपये ५, १०, १५, २० असे फ्लॅट रेट ठेवण्यात येणार आहेत. तसेच बेस्टच्या ताफ्यात १० हजार इलेक्ट्रिक बसेस, ९०० डबल-डेकर इलेक्ट्रिक बसेस असतील. विद्यार्थी आणि महिलांसाठी विशेष बेस्ट बसमध्ये मोफत प्रवास सुविधा सुरू करण्यात येतील.
महिलांसाठी १५०० रुपयांचा ‘स्वाभिमान निधी’
पाच वर्षांत १ लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट
तरुणांना २५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत स्वयंरोजगार सहाय्यता निधी
७०० स्क्वेअर फूटपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी
पाण्याचे दर स्थिर ठेवणार
सार्वजनिक आरोग्य
मुंबईकरांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य असणार आहे. मुंबईत पाच नवीन वैद्यकीय महाविद्यालये, पालिका रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये रुग्णांना जेनेरीक औषधी उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी २४x७ हेल्थ केअर कंट्रोल रूम आणि हेल्थ टु होम सेवा, महापालिकेची स्वतःची रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात येणार. तसेच मुंबई महापालिकेचे स्वतःचे कॅन्सर रुग्णालय असेल, असे वचन अमित ठाकरे यांनी दिले.
गेल्या तीन वर्षांत वाढलेले प्रदूषण तातडीने कमी करण्यासाठी मुंबई पर्यावरण कृती आराखड्याची कठोर अंमलबजावणी करणार. हवा गुणवत्ता निर्देशांक नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई बांधकाम पर्यावरणीय व्यवस्थापन योजना अंमलात आणणार. अनियंत्रित विकासामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे जंगल तसेच मुंबईतील कांदळवने आणि वृक्षसंपदा उद्ध्वस्त होऊ देणार नाही.
१०० युनिटपर्यंत वीज मोफत
घरगुती वीज वापर करणाऱ्या 'बेस्ट विद्युत'च्या ग्राहकांना १०० युनिटपर्यंत वीज मोफत देणार. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये बेस्ट विद्युतच्या विस्तारीकरणासाठी विशेष योजना आखणार. डिसॅलिनेशन प्रकल्प उभारणार. एसटीपी प्रकल्प वेळेत पूर्ण करणार, नवीन इमारतींमध्ये रेनवॉटर परकोलेशन पिट्स आणि मुंबईत काही ठराविक जागी रेन वॉटर होल्डिंग टॅंक्स साकरणार. सध्याच्या अत्यल्प दरातच मुंबईकरांना, मग तो टॉवरमध्ये राहणारा असो की वस्ती-पाड्यात, प्रत्येकाला स्वच्छ आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणार.