तारापोरवाला मत्स्यालयाचा होणार कायापालट; ९०० कोटींचा प्रकल्प; ३८,००० मासे व स्कुबा डायव्हिंग; ऑक्टोबरमध्ये भूमिपूजनाची शक्यता 
मुंबई

तारापोरवाला मत्स्यालयाचा होणार कायापालट; ९०० कोटींचा प्रकल्प; ३८,००० मासे व स्कुबा डायव्हिंग; ऑक्टोबरमध्ये भूमिपूजनाची शक्यता

कोविड महामारीनंतर बंद असलेले दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक ‘तारापोरवाला मत्स्यालया’चा कायापालट करण्यात येणार आहे. मत्स्यालयाचे रूप पूर्णपणे बदलण्यात येणार असून त्याचे जागतिक दर्जाच्या सागरी आकर्षणस्थळात रूपांतर करण्यात येणार आहे.

प्रतिनिधी

स्वीटी भागवत/मुंबई :

कोविड महामारीनंतर बंद असलेले दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक ‘तारापोरवाला मत्स्यालया’चा कायापालट करण्यात येणार आहे. मत्स्यालयाचे रूप पूर्णपणे बदलण्यात येणार असून त्याचे जागतिक दर्जाच्या सागरी आकर्षणस्थळात रूपांतर करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन ऑक्टोबरपर्यंत होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिली.

या पुनर्विकसित मत्स्यालयात सुमारे ३८ हजार प्रकारचे मासे पाहायला मिळतील. याशिवाय पर्यटकांना स्कुबा डायव्हिंगचा अनोखा अनुभवही घेता येईल. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रातील एका खासगी कंपनीसोबत भागीदारी केली असून एक आंतरराष्ट्रीय सल्लागारही नियुक्त केला आहे. मरिन ड्राईव्ह किनारपट्टीवर उभारण्यात येणारी ही नवी इमारत पर्यटकांसाठी एक प्रमुख वास्तुकला आकर्षण ठरेल, ज्यामध्ये दोन मजले मत्स्यव्यवसाय विभागासाठी राखीव असतील.

“याबाबत मी अद्याप अधिकृत घोषणा करू शकत नाही, मात्र हा प्रकल्प अत्यंत प्रतिष्ठित आणि आयकॉनिक असेल,” असे नितेश राणे म्हणाले. या प्रकल्पासाठी एकूण ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्र सरकार ४०० कोटी रुपयांचे योगदान देणार असून उर्वरित ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक संबंधित खासगी कंत्राटदार करणार आहे.

चर्नी रोडजवळ असलेले तारापोरवाला मत्स्यालय हे भारतातील सर्वात जुन्या सार्वजनिक मत्स्यालयांपैकी एक आहे. कोरोना काळात बंद झाल्यानंतर २०२२ मध्ये ही इमारत रचनात्मकदृष्ट्या असुरक्षित घोषित करण्यात आली होती. त्यामुळे सरकारने याच्या संपूर्ण पुनर्विकासाची योजना आखली आहे.

लहानपणी तारापोरवाला मत्स्यालयाला दिलेल्या भेटींच्या आठवणी सांगताना राणे म्हणाले, “लहानपणी मी अनेकदा या मत्स्यालयाला भेट दिली आहे. त्यामुळे या पुनर्विकासाला माझ्यासाठी भावनिक महत्त्व आहे. प्रत्येक मुंबईकराला अभिमान वाटेल, असे हे नवे आकर्षण आम्ही उभारू इच्छितो.”

प्रस्तावित तारापोरवाला मत्स्यालयाविषयी

  • नवीन इमारत मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्यालगत आकर्षक स्वरूपात उभारली जाणार असून, समुद्राचे विहंगम दृश्य अनुभवता येईल.

  • या इमारतीतील दोन मजले मत्स्यव्यवसाय विभागासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.

  • या प्रकल्पावर एकूण सुमारे ९०० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्यापैकी ४०० कोटींचा खर्च हा महाराष्ट्र सरकार करणार असून, उर्वरित ५०० कोटींची गुंतवणूक खासगी कंत्राटदार करणार आहे.

  • या पुनर्विकासादरम्यान जुनी इमारत पाडून तिच्या जागी आधुनिक सागरी शिक्षण आणि पर्यटन केंद्र उभारले जाणार आहे.

  • या प्रकल्पामुळे मुंबईची गणना जागतिक स्तरावरील सार्वजनिक मत्स्यालयांसाठी प्रसिद्ध शहरांमध्ये होण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कुलाब्याहून नवी मुंबई विमानतळ १६ मिनिटांत! बंदरे विकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची माहिती

एसटीच्या २१३ जागांच्या विकासाला 'हिरवा कंदील'; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

३० मीटरच्या हद्दीत बांधकामांवर प्रतिबंध; रेल्वे प्रशासनाचे कडक धोरण

त्रिभाषा सूत्राबाबत स्पष्टीकरण मागवले

राज्यातील धरणांमध्ये ४४ टक्के पाणीसाठा; गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांनी कमी