मुंबई

सासरे आणि जावई यांची जोडी महाराष्ट्राच्या विधीमंडळात काम करणार

राज्याच्या विधिमंडळात रविवारी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली.

प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सर्वोच्च पद हे एकाच कुटुंबात जाण्याचा दुर्मिळ योग घडून आला आहे. राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विजयी झाल्याने सासरे आणि जावई यांची जोडी महाराष्ट्राच्या विधीमंडळात पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती म्हणून जावई आणि सासरे अशी जोडी काम करणार आहे.

राज्याच्या विधिमंडळात रविवारी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. भाजपचे राहुल नार्वेकर हे १६४ विरुद्ध १०७ अशा मतांनी विजयी झाले. त्यानंतर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी प्रस्ताव संमत झाल्याची घोषणा करत नार्वेकर यांच्या नावाची घोषणा केली.

राहुल नार्वेकर हे कुलाब्याचे भाजप आमदार आहेत. शिवसेनेने लोकसभेसाठी उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी २०१४मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या नार्वेकर यांना शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून पराभवाचा सामना करावा लागला. २०१९मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपची वाट धरली होती.

राहुल नार्वेकर यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. सातारा जिल्ह्यातील निंबाळकर हे फलटणच्या निंबाळकर घराण्याचे २९वे वंशज आहेत. ते १९९५ साली फलटण विधानसभा मतदारसंघातून सर्वप्रथम अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. त्यावेळी निंबाळकरांनी २२ अपक्षांना एकत्र करत तत्कालिन शिवसेना-भाजप युती सरकारला पाठिंबा दिला होता. युती सरकारच्या त्या राजवटीमध्ये निंबाळकर हे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष होते. १९९९मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर निंबाळकर यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये आधी राज्यमंत्री आणि नंतर कॅबिनेट मंत्रिपद त्यांनी सांभाळले. त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्य नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने २०१० साली सर्वप्रथम विधान परिषदेवर संधी दिली. सध्या ते विधान परिषदेचे सभापती आहेत.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत