रणवीर, आमीरच्या घराचीही रेकी; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी एकूण ८ आरोपी अटकेत 
मुंबई

रणवीर, आमीरच्या घराचीही रेकी; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी एकूण ८ आरोपी अटकेत

टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणातील आरोपींनी अभिनेता रणवीर सिंह याच्या प्रभादेवी येथील निवासस्थानाची, तसेच सलमान खानच्या वांद्रे आणि आमिर खानच्या खार येथील निवासस्थानांची रेकी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Swapnil S

मुंबई : टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणातील आरोपींनी अभिनेता रणवीर सिंह याच्या प्रभादेवी येथील निवासस्थानाची, तसेच सलमान खानच्या वांद्रे आणि आमिर खानच्या खार येथील निवासस्थानांची रेकी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींची संख्या आठवर पोहोचली आहे. नव्याने अटक केलेल्या पाच जणांना मुंबईत आणण्यात आले असून पोलिस कोठडी मिळावी यासाठी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

लॉरेन्स बिश्नोई टोळीने शस्त्रे मुंबईत पोहोचवण्यासाठी महिलांचा वापर केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. नव्याने अटक करण्यात आलेले आरोपी सुमित आणि कुणाल यांनी पंजाबमधील अमृतसर येथे जाऊन शस्त्रे मिळवली. त्यानंतर ही शस्त्रे कथितरीत्या बबिता आणि राधा या दोन महिलांकडे सोपवण्यात आली. त्यांनी रेल्वेने मुंबईत येऊन ती तीन हल्लेखोरांपर्यंत पोहोचवल्याचा संशय आहे.या प्रकरणातील आठवा आरोपी अंकित याला बुधवारी हरियाणातील सोनीपत येथून अटक करण्यात आली. गोळीबारापूर्वी तो मुंबईत तीन हल्लेखोरांसोबत राहत होता आणि त्यांना आवश्यक रसद व इतर मदत पुरवत होता, असा पोलिसांचा आरोप आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे शस्त्रपुरवठ्याच्या कथित जाळ्याचा माग काढण्यात आला आणि अन्य आरोपींची ओळख पटवण्यात आली, असे पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी सांगितले.

“पहिल्या तीन अटकेनंतर पुढील तपासात आणखी पाच आरोपींचा सहभाग समोर आला. या अटकांमुळे प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आठ झाली आहे,” असे रोशन यांनी स्पष्ट केले.

हरियाणातील सुमित, कुणाल आणि अंकित, तसेच उत्तर प्रदेशातील बबिता आणि राधा या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना मुंबईत आणल्यानंतर न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापैकी चार जणांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली, तर अंकितला स्थानिक पोलिसांच्या मदतीने हरियाणातून ताब्यात घेण्यात आले.

नव्याने अटक केलेल्या आरोपींची पार्श्वभूमी

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवरील गोळीबारप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख, त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि कथित भूमिकेबाबत नवी माहिती समोर आली आहे.

कुणाल (वय २१, सोनीपत, हरियाणा) - कुणालचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. तो या प्रकरणातील सहआरोपी सुमितच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येते. त्याची प्रेयसी राधा हिलाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

सुमित (वय १९, सोनीपत, हरियाणा) - सुमितचे शिक्षण आठवीपर्यंत झाले असून, यापूर्वी त्याने कपड्यांच्या दुकानात काम केले होते.

राधा सुनील वर्मा (वय २९, सीतापूर, उत्तर प्रदेश) - राधाचे शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे. या प्रकरणातील आरोपी कुणालसोबत तिचे प्रेमसंबंध असल्याचे सांगण्यात येते.

बबिता राज रामजतन राव (वय २४, आझमगड, उत्तर प्रदेश) - बबिताने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. ती विद्युत वायरिंगशी संबंधित काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

अंकित राजेश खटक (वय १८, सोनीपत, हरियाणा) - अंकितचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. गोळीबाराच्या घटनेपूर्वी तो सुमारे २० दिवस मुंबईत मुख्य आरोपींसोबत राहिला होता आणि या काळात त्याने कथितरित्या रेकी केल्याचा संशय आहे.

समीर (वय २०, सोनीपत, हरियाणा) - समीर हा या प्रकरणातील मुख्य आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबाराच्या कटातील त्याची कथित भूमिका तपासली जात आहे...

हल्ल्यासाठी दोन लाख रुपयांचे आमिष?

तपास अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, अनिल पंडितने गोळीबार करणाऱ्या तिघांना हल्ल्यासाठी दोन लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. या कथित व्यवहाराचा भाग म्हणून आरोपींना अनुक्रमे ३५ हजार आणि ५५ हजार रुपयांची रक्कम अंशतः मिळाल्याची माहिती तपासात समोर आली आहे. प्रत्यक्षात किती रक्कम देण्यात आली, पैशांचा स्रोत काय होता आणि प्रत्येक आरोपीची भूमिका काय होती, याचा तपास सुरू आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सौरभ दास, आशुतोष रांका यांची सुटका; CJP नेत्यांबाबत विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai : पोलीस, पालिका आयुक्तांना हायकोर्टाचे समन्स; वायू प्रदूषण रोखण्यात अपयश; २६ ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश

दुष्टचक्रात अडकलेला क्युबा

शेतकरी विकसित भारताच्या केंद्रस्थानी

आजचे राशिभविष्य, २२ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत