मुंबई : 'देशातील तरुण आपल्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरले असताना त्यांच्याशी संवाद साधायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ नाही. मात्र महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात गद्दारी केलेल्यांना भेटण्यासाठी वेळ आहे. एवढेच नव्हे, तर त्यांना 'भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे' असा धीर दिला जातो. पंतप्रधानांचे हे वक्तव्य नेमके कुणासाठी होते, याचा खुलासा त्यांनी करावा', असे आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. तसेच '... मी तुमच्या पाठीशी आहे', हा धमकीवजा संदेश मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाला, अमित शहांना की देवेंद्र फडणवीसांना दिला आहे? असा सवालही केला.
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना ठाकरे गटातून फुटलेल्या आणि शिंदे गटात विलीनीकरण झालेल्या सहा खासदारांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांची संसदेत भेट घेतली होती. या भेटीत मोदी यांनी 'भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी आहे', असा विश्वास दिला होता. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला.
'सर्वोच्च न्यायालयात आमच्या याचिकेवर सुनावणी सुरू असताना, जे पंतप्रधान जेन-झींना भेटले नाहीत, पण गद्दारांना भेटतात आणि गद्दारांना सांगतात की 'भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे'. पंतप्रधान आणि शिंदे यांच्यातील भेट बंद दाराआडची असेल, तर त्या चर्चेतील 'भिऊ नका, मी तुझ्या पाठीशी आहे' नेमके हेच वाक्य बाहेर आणण्याचे कारण काय?, गद्दारांना आता नेमके भय कसले आहे? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतरही त्यांची पुन्हा पळापळ का होतेय?', असे सवाल ठाकरे यांनी केले. 'इतर डाग धुतले गेले असतील; मात्र गद्दारीचा डाग धुतला जात नाही', अशा शब्दात ठाकरे यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले. 'खरं तर पंतप्रधानांनी, मी तुमच्या पाठीशी आहे, मी देशाचा पंतप्रधान आहे, तुमचा मोठा भाऊ आहे, आजोबा आहे किंवा मित्र आहे', असा धीर त्यांनी आंदोलक तरुणांना द्यायला हवा होता', असा टोलाही ठाकरेंनी लगावला.
इन्स्टाग्रामवर संवाद साधण्याची वेळ आलीय...
'कोरोनाच्या काळात आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होतो. तेव्हा 'फेसबुकवरून सरकार चालत नाही' असे सांगणाऱ्यांवर आता इन्स्टाग्रामवरून तरुणांशी संवाद साधण्याची वेळ आली आहे. देशातील भाग्यविधाते असलेल्या तरुणांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी वेळ नाही; पण सोशल मीडियावरून त्यांना संदेश देण्याची वेळ यांच्यावर आली आहे. सरकारची अवस्था किती खराब झाली आहे, हे यावरून दिसते', अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
'गद्दारीचा व्हायरस' लोकशाहीचा जीव घेतोय !
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि गद्दारीचा मुद्दा आता केवळ शिवसेनेपुरता मर्यादित राहिलेला नाही. 'गद्दारीचा व्हायरस' संपूर्ण देशात पसरत असून तो लोकशाहीचा जीव घेत आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
संविधान आणि लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या देशातील प्रत्येक नागरिकाने या लढाईत सहभागी होण्याची गरज आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या देशवासीयांनी लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी एकत्र आले पाहिजे, असे आवाहनही ठाकरे यांनी यावेळी केले.
भागवतांच्या संवादावरही टीका
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकताच तरुणांशी संवाद साधला. याविषयी विचारले असता ठाकरे यांनी, तरुणांची नाराजी केवळ प्रवचनांनी दूर होणार नाही. सरकार तुमचे आहे, तुम्ही मेहनत करून ते आणले आहे, मग तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला जाब का विचारला जात नाही, असा सवाल त्यांनी भागवत यांना केला. तरुणांमध्ये असलेला असंतोष गंभीर असून, त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची गरज आहे. केवळ भाषणे किंवा सोशल मीडिया संदेशांनी हा प्रश्न सुटणार नाही, असेही ठाकरे म्हणाले.