मुंबई : ‘आपल्याला विधानसभेवरच नव्हे, तर लाल किल्ल्यावरही भगवा फडकवायचा आहे. हो, आम्ही ‘रेजीम चेंज’ करायला उभे राहिलो आहोत. ‘रेजीम चेंज’ का नाही करायची ते सांगा, असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ता परिवर्तनाचे रणशिंग फुंकले. सरकार बदलण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
सत्ताबदलाच्या उद्देशानेच आपण सरकारविरोधी आंदोलनांना पाठिंबा देत असल्याची स्पष्ट कबुली ठाकरे यांनी मंगळवारी दिली. तरुणांच्या तक्रारी ऐकून घेणारे कोणीच नसल्याने जनरेशन झेड अर्थात नव्या पिढीला रस्त्यावर उतरावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘रावणाचे प्राण त्याच्या बेंबीत होते. त्याचप्रमाणे त्यांचे (सरकारचे) प्राण ज्ञानेश कुमार यांच्यात आहेत. त्यामुळेच त्यांच्या संरक्षणासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे,’ असे ठाकरे म्हणाले.
आंदोलक नक्षलवादी नाहीत, क्रांतिकारक
ते म्हणाले की, भगवा हीच आमची ओळख आहे. आमची ओळख कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. ‘मतचोरी’ सर्वांचीच होत आहे, विशेषतः नवमतदारांची; त्यामुळे तरुणांनी आंदोलन करणे हा त्यांचा अधिकार आहे.
‘सत्तापरिवर्तन’ घडवून आणण्यासाठी आम्ही उभे आहोत. रस्त्यावर उतरलेले आंदोलक तरुण नक्षलवादी नाहीत, तर आपल्या हक्कांसाठी लढणारे क्रांतिकारक आहेत, असे ठाकरे म्हणाले.तिरंग्यातील रंग वेगळे करून सत्ताधारी भाजप जनतेत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. भगवा गळ्यात घालून महिलांची छेड काढणाऱ्यांचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. भाजप हिंदुत्वाला बदनाम करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
हल्लेखोर शस्त्रे घेऊन आले कसे?
‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर साबरमती तुरुंगात जाऊन, बिष्णोईला घेऊन या,’ असे मुख्यमंत्री फडणवीस यांना आव्हान देत टीका केली. आरोपी शस्त्र घेऊन आले तेव्हा पोलिसांना कळले नाही का? अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यावरून उद्धव ठाकरेंनी मुंबई पोलिसांवर टीका केली. ‘सुदैवाने टायगर श्रॉफ वाचला. पण वार वर्मी लागला असता तर काय झाले असते?’ असे म्हणत त्यांनी चिंता व्यक्त केली.
‘आंदोलकांना ‘शहरी नक्षलवादी’ ठरवण्यावर टीका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांना ‘शहरी नक्षलवादी’ संबोधल्याबद्दलही ठाकरे यांनी आक्षेप घेतला. ‘महाराष्ट्रात शहरी नक्षलवाद कुठे आहे? महाराष्ट्रावर डाग का लावत आहात? कोणी न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरले, तर तुम्ही त्याला शहरी नक्षलवादी ठरवता,’ असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींवरही निशाणा
ठाकरेंनी यावेळी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. ‘दसऱ्याच्या दिवशी सोने लुटायचे असते, सोने हे सांकेतिक आहे. पण पंतप्रधान म्हणतात सोनेच खरेदी करू नका. सोने लुटायचे तर दूर, लोकशाही लुटली जाते, मते चोरली जातात, मग काय लुटायचे बाकी ठेवले? सगळे लुटून झाल्यानंतर दादही मागायची नाही. सगळ्या संस्था म्हणजेच न्यायालय, पोलीस, नोकरशाहा, मुख्यमंत्री, सगळ्यांचे दरवाजे ठोठावून झाल्यावर दाद लागत नसेल, तर कोणी चिडून, संतापून रस्त्यावर उतरला तर त्याला नक्षलवादी, गुंड ठरवणार का?, असे म्हणत त्यांनी टीका केली.
शेतकऱ्यांना ५ हजारांच्या मदतीवरून टीका
राज्य सरकारने शेतकऱ्यांना दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ५ हजार रुपये देणार असल्याची घोषणा केली. यावरूनही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली. ‘ओल्या दुष्काळात किती शेतकऱ्यांना सरकारने मदत केली? अतिवृष्टीवेळी सर्वात मोठे पॅकेज असे मुख्यमंत्री म्हणाले होते. नमो किसान योजनेचे २ हफ्ते शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. शेतकऱ्यांच्या तोंडावर ५ हजार रुपये फेकून मारले. सहलीला पैसे नाहीत म्हणून एका मुलाने आत्महत्या केली. हे सरकार केवळ घोषणा करत आहे. कर्जमाफी जाहीर केली, पण किती जणांना मदत केली?” असा सवाल त्यांनी केला.
पोलिसांनी लांडग्यासारखे वागू नये...
‘धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला, भीमनवारला रजेवर पाठवला. मग, तुम्ही ज्ञानेशकुमारचा राजीनामा का घेतला नाही? बारा वर्षे तुम्ही देशाला छळले आहे, त्याची फळे आता तुम्हाला चाखावी लागतील. तुम्ही यांना झुरळ म्हणालात, दिमागी नक्षल म्हणता. कारण या लोकांनी देशाच्या क्रांतीमध्ये भाग घेतला होता. मला पोलिसांना सांगायचे आहे, तुम्ही लांडग्यासारखे वागू नका. काल त्यांची मान पकडली, उद्या तुमची ते मान पकडतील तेंव्हा वाचवायला हे तरुणच असतील. दंडुका मारताना उलटा फिरणार नाही ना, याचा विचार करा, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी झेन-जी आंदोलकांचे कौतुक केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेली काही पुस्तके विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील एका पोस्टच्या आधारे त्यांनी हा आरोप केला. मात्र, संबंधित विद्यापीठाचे नाव त्यांनी स्पष्ट केले नाही.
‘बेरोजगारीत जय श्रीरामच्या घोषणा कशासाठी?’
केंद्र सरकारच्या आत्मनिर्भरतेच्या घोषणेवरही ठाकरे यांनी टीका केली. ‘आम्ही मंदिर बांधू आणि तेही लुटू, हीच यांची आत्मनिर्भरता आहे. आज धर्माचे राजकारण सुरू आहे. ‘हाताला नाही काम, बोल जय श्रीराम’ हे आम्ही सहन करणार नाही,” असे ठाकरे म्हणाले. बेरोजगारीचा प्रश्न कायम असताना धार्मिक घोषणांच्या माध्यमातून राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ज्ञानेश कुमार यांची तुलना रावणाशी
४८ मिनिटांच्या भाषणात ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील घोळ, देशभर सुरू असलेली आंदोलने आणि महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती या मुद्द्यांचा उल्लेख केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची तुलना त्यांनी राक्षसराज रावणाशी केली. यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह या मेळाव्याला अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दर्शवली होती. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी देशातील विविध विषयांवर महत्त्वाचे भाष्य केले.
आमचे ऐकले जात नसेल, तर काय करायचे?
शिवाजी पार्क येथे पक्षाच्या वार्षिक दसरा मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना ठाकरे म्हणाले, ‘होय, आम्ही सत्ताबदलासाठीच इथे आहोत. गेल्या १२ वर्षांत त्यांनी लोकशाहीची लूट केली. मतांची चोरी केली. सुमारे १३ कोटी लोकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. हे सर्वजण बांगलादेशी होते का? गेली १२ वर्षे तुम्ही देशाला त्रास दिला आहे. त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. आम्ही न्याय मागायचाही नाही का? मग सत्ताबदल का करू नये? चर्चा करूनही आमचे म्हणणे ऐकून घेतले जात नसेल, तर आम्ही काय करायचे?’ असा सवाल त्यांनी केला.