मुंबई

अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

अपघातानंतर पळून गेलेल्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे

नवशक्ती Web Desk

मुंबई : भरवेगात जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाच्या धडकेने ५० वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेची ओळख पटली नसून, तिची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळाहून पलायन केले आहे. त्याच्याविरुद्ध मानखुर्द पोलिसांनी हलगर्जीपणाने वाहन चालवून एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी सव्वापाच वाजता मानखुर्द येथील शीव-पनवेल मार्गावरील वाशीकडे जाणाऱ्या टी जंक्शन, उत्तर वाहिनीवर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत महिला ही टी जंक्शनजवळून जात असताना भरवेगात जाणाऱ्या एका कारने तिला जोरात धडक दिली होती. अपघातानंतर तिला वैद्यकीय मदत देणे तसेच अपघाताची माहिती पोलिसांना देणे गरजेचे असतानाही आरोपी चालक तेथून पळून गेला होता. अपघाताची माहिती मुख्य नियंत्रण कक्षातून प्राप्त होताच मानखुर्द पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या महिलेला पोलिसांनी तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृत महिलेकडे तिची ओळख पटेल, अशी कोणतीही वस्तू सापडली नाही. त्यामुळे तिची ओळख पटू शकली नाही. त्यामुळे तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस हवालदार सुनिल पाटील यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपघातानंतर पळून गेलेल्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

शासकीय जमिनीवरील पात्र घरांना कायदेशीर मान्यता; २०११ पूर्वीच्या पात्र घरांसाठी सुवर्णसंधी; ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार

Thane : सिग्नलवरील प्रतीक्षा अवधी १५ सेकंदांवर येणार; वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

आता पैशामुळे शस्त्रक्रिया थांबणार नाहीत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबईत ३३ ठिकाणी फ्लड गेट; पूरस्थितीचा इशारा देणारी सेन्सर यंत्रणा उभारणार; २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट