प्रत्येक दाम्पत्याला स्वत:चे मूल असावे, असे वाटत असते. अनेकांना अनेक कारणांनी मूल होत नाही. त्यासाठी देवपूजेपासून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. किमान एक तरी मूल आपल्याला व्हायला हवे यासाठी दाम्पत्य जिवाचा आटापिटा करतात. प्रत्येकाची इच्छा सफळ होतेच असे नाही. पण, जयपूरचे एक दाम्पत्य आजी-आजोबा होण्याच्या वयात म्हणजेत सत्तरीनंतर आई-बाबा झाले आहेत. लग्नानंतर ५४ वर्षे ते बाळ होण्याच्या प्रतिक्षेत होते.
राजस्थानच्या अलवरमध्ये राहणारे झुंझूनुतील सिंघाना गावातील ७५ वर्षीय माजी सैनिक गोपीचंद आणि त्यांची ७० वर्षांची पत्नी चंद्रावती यांना नुकतेच पहिले बाळ झाले. लग्नानंतर ५४ वर्षे ते बाळासाठी प्रयत्न करत होते. पण त्यांना मूल होत नव्हते. शेवटी गोपीचंद यांनी दीड वर्षांपूर्वी एका नातेवाईकामार्फत फर्टिलिटी क्लीनिकशी संपर्क केला व आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने चंद्रावती या गर्भवती राहिल्या.
अलवरच्या ‘इंडो आयव्हीएफ टेस्ट ट्यूब बेबी सेंटर’चे सायंटिफिक डायरेक्टर आणि अँब्रॉयोलॉजिस्ट डॉ. पंकज गुप्ता यांनी सांगितले की, चंद्रावती ९ महिन्यांपूर्वी आयव्हीएफ प्रकियेच्या तिसऱ्या प्रयत्नात गर्भवती झाली. त्यावेळी तिच्या आनंदाला पारावर नव्हता. पण वय जास्त असल्याने प्रेग्नन्सीच्या ९ महिन्यांच्या कालावधीत पोटात बाळ सांभाळणे आणि प्रसूती यशस्वी होईल की नाही, याबाबत साशंकता होती. पण अखेर सर्व सुरळीत घडून आले व सोमवारी तिने सुदृढ बाळाला जन्म दिला.
डॉक्टर गुप्ता म्हणाले, जून २०२२ मध्येच ‘आयव्हीएफ’बाबत कायदा आला आहे. ५० पेक्षा जास्त वयाच्या लोकांवर ही उपचार पद्धती करता येणार नाही. ज्यात पुरुष आणि महिला दोघांचा समावेश आहे. हे दाम्पत्य नशीबवान ठरले कारण कायदा लागू होण्यापूर्वी सदर महिला प्रेग्नंट होती.
गोपीचंद म्हणाले की, मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. आता मलाही मूल झाल्याने आम्ही आमचे कुटुंब पुढे नेऊ शकतो, याचा आनंद मला आहे.