अमृतसर : अमृतसर येथील श्री गुरू रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी परिसरात रविवारी रात्री एकाच वेळी अनेक संशयास्पद ड्रोन घिरट्या घालताना आढळल्याने खळबळ उडाली. सुरक्षेचा उपाय म्हणून सुमारे १ तास ३० मिनिटे विमानतळावरील सर्व उड्डाणे तत्काळ थांबवण्यात आली. तसेच दोन आंतरराष्ट्रीय विमानांसह एकूण ७ विमानांचा मार्ग बदलून ती दिल्ली विमानतळाकडे वळवण्यात आली.
विमानतळ संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास धावपट्टीजवळ संशयित ड्रोनचा वावर आढळून आला. या घटनेमुळे सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने आपत्कालीन यंत्रणा सतर्क करण्यात आली. पंजाब पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना या घटनेची माहिती देऊन तात्काळ कारवाई सुरू करण्यात आली आहे.
मार्ग वळवण्यात आलेल्या विमानांमध्ये मलेशिया एअरलाइन्स, इंडिगो, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या विमान कंपन्यांच्या उड्डाणांचा समावेश होता. याप्रकरणी पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांकडून अधिक तपास सुरू आहे.