दिवाळीच्या सणासाठी फराळाची तयारी सुरू असतानाच सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा झटका बसला आहे. अमूलने तूप आणि लोणीच्या किमतीत वाढ केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना या दुग्धजन्य पदार्थांच्या खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. १ किलो तुपाच्या कार्टनची किंमत तब्बल ५० रुपयांनी वाढवण्यात आली असून, ५०० ग्रॅम लोण्याच्या पाकिटासाठी १५ रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. गुजरातसह अनेक बाजारपेठांमध्ये अमूलच्या गायीच्या तुपाचा तुटवडा जाणवत असतानाच ही दरवाढ करण्यात आली आहे.
अमूलच्या तूप आणि लोण्याचे नवे दर काय?
'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, अमूलच्या १ किलो तुपाच्या कार्टनची किंमत ६३० रुपयांवरून ६८० रुपये करण्यात आली आहे. तर ५०० ग्रॅम शुद्ध तुपाच्या पाऊचसाठी आता ३४५ रुपये मोजावे लागतील. यापूर्वी त्याची किंमत ३२५ रुपये होती.
लोण्याच्या किमतीतही वाढ झाली आहे. १०० ग्रॅम लोण्याचे पाकीट ६३ रुपयांऐवजी आता ६६ रुपयांना मिळणार आहे. तर ५०० ग्रॅम लोण्याच्या पाकिटाची किंमत ३१० रुपयांवरून ३२५ रुपये झाली आहे.
अमूलच्या उत्पादनांचे जुने आणि नवे दर पुढीलप्रमाणे :
जीएसटी कपातीनंतर मिळालेला दिलासा कमी
सप्टेंबर २०२५ मध्ये वस्तू आणि सेवा करात (GST) कपात करण्यात आली होती. त्यावेळी दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी झाला होता. या निर्णयानंतर अमूलने आपल्या सुमारे ७०० दुग्धजन्य उत्पादनांच्या किमती कमी केल्या होत्या. मात्र, आता झालेल्या दरवाढीमुळे ग्राहकांना मिळालेल्या दिलाशाचा मोठा भाग कमी झाला आहे.
जीएसटी कपातीनंतर १ लिटर तुपाच्या कार्टनची किंमत ६५० रुपयांवरून ६१० रुपये झाली होती. ५ लिटर तुपाचा डबा ३,२७५ रुपयांऐवजी ३,०७५ रुपयांना मिळू लागला होता. त्याचप्रमाणे १०० ग्रॅम लोण्याचे पाकीट ६२ रुपयांवरून ५८ रुपये, तर ५०० ग्रॅम पाकीट ३०५ रुपयांवरून २८५ रुपये करण्यात आले होते.
गायीच्या तुपाची मागणी वाढली; बाजारात तुटवडा
अमूलच्या तुपाच्या दरवाढीमागे वाढती मागणी आणि पुरवठ्यातील अडचणी हे महत्त्वाचे मुद्दे असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. गुजरातमधील वडोदरा आणि अहमदाबाद येथील किरकोळ विक्रेत्यांच्या माहितीनुसार, गणेशोत्सवापासून विशेषतः गायीच्या तुपाचा साठा कमी होत आहे. मागणीत अचानक वाढ झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
अहमदाबादमधील सॅटेलाइट परिसरातील डी-मार्टच्या एका दुकानात मंगळवारी अमूलचे तूप आणि लोणी उपलब्ध नसल्याचेही वृत्तात म्हटले आहे. गुजरातबरोबरच पुणे, कोलकाता आणि जम्मू-काश्मीरमधूनही पुरवठ्यातील अडचणींच्या तक्रारी समोर आल्या आहेत. मात्र, या तुटवड्यामागील नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.
भेसळयुक्त तुपावरील कारवाईमुळे नामांकित ब्रँडची मागणी वाढली?
गुजरात आणि राजस्थानमध्ये भेसळयुक्त उत्पादनांविरोधात झालेल्या कारवाईनंतर नामांकित कंपन्यांच्या तुपाची मागणी वाढल्याचे एका सहकारी संस्थेच्या नेत्याने सांगितले आहे. त्यांच्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांत या दोन्ही राज्यांतील विविध भागांतून सुमारे २ लाख किलो बनावट तूप जप्त करण्यात आले आहे. या कारवाईनंतर ग्राहकांचा कल अमूलसारख्या प्रस्थापित ब्रँडकडे वाढल्याचे त्यांनी नमूद केले.
वर्षभरातील एकूण तूपवापरापैकी जवळपास ४५ टक्के वापर सणासुदीच्या काळात होतो. त्यामुळे या काळात मागणी वाढून पुरवठा व्यवस्थेवर ताण येतो, असेही त्यांनी सांगितले.
दिवाळीच्या आधी ग्राहकांच्या अडचणी वाढल्या
वडोदऱ्यातील अमूल पार्लर चालकांच्या म्हणण्यानुसार, वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी गायीच्या तुपाचा पुरवठा अद्याप पुरेसा होत नाही. एका पार्लर चालकाने नेहमीच्या गरजेच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात माल मिळत असल्याचे सांगितले. गणेशोत्सवापासून त्यांच्या दुकानात गायीच्या तुपाचा पुरवठा झालेला नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
दिवाळीच्या काळात लाडू, करंजी, चकली आणि इतर फराळाचे पदार्थ तयार करण्यासाठी तूप आणि लोण्याचा वापर वाढतो. अशा वेळी या पदार्थांच्या किमती वाढल्याने ग्राहकांच्या खर्चात भर पडणार आहे. दरवाढीबरोबरच काही बाजारपेठांमध्ये उत्पादनांचा तुटवडा असल्याने ग्राहकांना अधिक पैसे मोजूनही हवे ते उत्पादन मिळवण्यासाठी धावपळ करावी लागू शकते.