'अम्मा... नाना...' चिमुकल्याची हाक; ३ वर्षांच्या मुलाला पुलावर सोडून दाम्पत्याची गोदावरीत उडी व्हायरल व्हिडीओवरून घेतलेला स्क्रीनशॉट
राष्ट्रीय

'अम्मा... नाना...' चिमुकल्याची हाक; ३ वर्षांच्या मुलाला पुलावर सोडून दाम्पत्याची गोदावरीत उडी

आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात ३ वर्षांच्या मुलाला पुलावर एकटं सोडून दाम्पत्याने गोदावरी नदीत उडी घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.

Mayuri Gawade

आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात गुरुवारी रात्री हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. एका दाम्पत्याने आपल्या ३ वर्षांच्या मुलाला पुलावर एकटं सोडून गोदावरी नदीत उडी घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रात्रीच्या अंधारात पुलावर एकटाच रडत असलेल्या मुलाकडे जाणाऱ्यांचे लक्ष गेले. "अम्मा... नाना..." म्हणत आई-वडिलांना हाक मारणाऱ्या या चिमुकल्याला अखेर पोलिसांनी ताब्यात घेत कुटुंबीयांकडे सुरक्षित सुपूर्द केले. दरम्यान, नदीत बेपत्ता झालेल्या दाम्पत्याचा शोध सुरू आहे.

मुलाला स्कूटरजवळ सोडून नदीत उडी

ही घटना चिंचिनाडा वशिष्ठ पुलावर गुरुवारी रात्री घडली. दोड्डा साई (२९) आणि त्यांची पत्नी शिरीषा (२८) हे वेलपुरू गावातील रहिवासी आहेत. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, दोघे रात्री सुमारे १० वाजता ३ वर्षांच्या मुलासह स्कूटरवरून पुलावर आले. त्यानंतर मुलाला स्कूटरजवळ सोडून दोघांनी दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरी नदीत उडी मारली असल्याचे सांगितले जात आहे.

काही वेळाने पुलावरून जाणाऱ्या नागरिकांना मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. तो आई-वडिलांना "अम्मा... नाना..." अशी हाक मारत होता. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मुलाला ताब्यात घेतले आणि त्याला नातेवाईकांकडे सोपवले. पोलिसांनी स्थानिक बचाव पथक, जलतरणपटू आणि बोटींच्या मदतीने नदीत शोध मोहीम सुरू केली आहे. हे वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत या जोडप्याचा शोध लागला नव्हता.

घटनेमागे आर्थिक अडचणींचा संशय

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, दोड्डा साई (वडील) चालक म्हणून काम करत होते. काही काळ ते आखाती देशातही कामासाठी गेले होते. मात्र, वाढतं कर्ज आणि आर्थिक तणावामुळे त्यांनी घर विकण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेमागचं एकमेव कारण आर्थिक अडचणी असल्याचं पोलिसांनी अद्याप अधिकृतपणे स्पष्ट केलेलं नाही. या प्रकरणी पोलिसांनी नोंद घेतली असून, दाम्पत्याने हे टोकाचं पाऊल का उचललं, याचा पुढील तपास सुरू आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : विद्याविहार उड्डाणपुलाच्या नामकरणावरून संघर्ष; नाना पाटेकर व स्मित मच्छार यांच्या नावाची मागणी

Navi Mumbai : क्षुल्लक कारणातून रिक्षाचालकाची हत्या; मुख्य सूत्रधारासह पाच जण अटकेत, दोन अल्पवयीनांचाही सहभाग

सिंधुदुर्ग : कुडाळमध्ये महाविद्यालयीन युवतीची हत्या

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात चाऱ्याचा, स्थलांतराचा प्रश्न गंभीर; मागणी व पुरवठा यात मोठी तफावत

एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेसची सौदीला जाणारी उड्डाणे रद्द