गांधीनगर : केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा गुरुवांरी (१६ जानेवारी) गुजरातमधील ऐतिहासिक वडनगर शहरात कोट्यवधी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. या प्रकल्पांमध्ये पुरातत्व अनुभव संग्रहालय, प्रेरणा संकुल आणि आधुनिक क्रीडा संकुल यांचा समावेश आहे. वडनगरला भेट देणाऱ्या पर्यटकांना एक अद्वितीय आणि समृद्ध अनुभव प्रदान करणे असा या प्रकल्पांचा उद्देश आहे.
वडनगरला २,५०० हून अधिक वर्षांचा इतिहास आहे. वडनगर, गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील एक प्राचीन शहर, सुमारे २,५०० वर्षांच्या समृद्ध इतिहासाने परिपूर्ण आहे. सात वेगवेगळ्या राजवंशांचे शासन पाहिलेल्या या शहराचा व्यापारी मार्गांवरील एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उत्कर्ष झाला आहे. हिंदू, बौद्ध, जैन आणि इस्लामिक परंपरांचा संगम असलेल्या या शहराचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी गुजरात सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी दृष्टिकोनाखाली प्रयत्नशील आहे.
विकास प्रकल्पांची वैशिष्ट्ये
पुरातत्व अनुभव संग्रहालय हे २९८ कोटी खर्चून उभारण्यात आलेले भारतातील पहिले अशा प्रकारचे संग्रहालय आहे. १२,५०० चौरस मीटरमध्ये पसरलेल्या या संग्रहालयात ५,००० हून अधिक पुरातन वस्तूंचे प्रदर्शन केले जाणार आहे. येथे ऑडिओ-व्हिज्युअल चित्रपट, परस्परसंवादी प्रदर्शन, आणि पुरातन उत्खनन स्थळास जोडणारा पूल आहे. प्रेरणा संकुल ७२ कोटी खर्चून उभारलेले असून हे संकुल वडनगरमधील ऐतिहासिक प्राथमिक शाळेचे आधुनिक केंद्रात रूपांतर करणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या शालेय शिक्षणाची आठवण म्हणून या ठिकाणी नवीन पिढ्यांना प्रेरित करण्याचा हेतू आहे. क्रीडा संकुल ३३.५० कोटी खर्चून उभारलेले असून हे संकुल ४०० मीटर सिंथेटिक धावपट्टी, फुटबॉल मैदान, कबड्डी, खो-खो, आणि व्हॉलीबॉलसाठी सुविधा उपलब्ध करून देणार आहे. दिव्यांग क्रीडाप्रेमींसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
वडनगरमधील अन्य महत्त्वाचे उपक्रम
नरेंद्र मोदी यांनी २००३ मध्ये सुरू केलेल्या तन-रिरी संगीत महोत्सवाचे आयोजन, ४,५०० वर्षे जुन्या शर्मिष्ठा सरोवराचे नूतनीकरण आणि त्याभोवती मनोरंजन सुविधांची उभारणी करणे, तसेच पर्यटकांसाठी वडनगर रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. अमित शहा यांच्या हस्ते या सर्व प्रकल्पांचे उद्घाटन होणार असून, यामुळे वडनगरला जागतिक पर्यटन नकाशावर अधोरेखित केले जाणार आहे. या प्राचीन शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वाला उजाळा देत तेथे आधुनिक सुविधा आणि परंपरेचा संगम साधला जाणार आहे.