Photo : X
राष्ट्रीय

तुम्ही शंकराचार्य कशावरून? अविमुक्तेश्वरानंद यांना माघ मेळा प्रशासनाची नोटीस

प्रयागराज माघ मेळा प्रशासनाने ज्योतिष्पीठाचे शंकराचार्य असल्याचा दावा करणाऱ्या स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना तुम्ही शंकराचार्य कशावरून? अशी ‘कारणे दाखवा नोटीस’ पाठवली असून २४ तासांच्या आत लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Swapnil S

प्रयागराज : प्रयागराज माघ मेळा प्रशासनाने ज्योतिष्पीठाचे शंकराचार्य असल्याचा दावा करणाऱ्या स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना तुम्ही शंकराचार्य कशावरून? अशी ‘कारणे दाखवा नोटीस’ पाठवली असून २४ तासांच्या आत लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद हे प्रयागराजमध्ये रथ थांबवल्याच्या निषेधार्थ धरणे धरून बसले आहेत.

या नोटिशीत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला असून, न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना स्वतःला ज्योतिष्पीठाचे शंकराचार्य म्हणून सादर करण्याचा अधिकार कसा, असा थेट प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. जोपर्यंत उच्च न्यायालयाकडून पट्टाभिषेकाबाबत अंतिम किंवा अंतरिम आदेश दिला जात नाही, तोपर्यंत कोणताही धर्माचार्य स्वतःला ज्योतिष्पीठाचा शंकराचार्य म्हणून घोषित करू शकत नाही. अशा परिस्थितीत स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा दावा न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन ठरू शकतो, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

मौनी अमावस्येच्या दिवशी प्रयागराज माघ मेळ्यात मोठा वाद निर्माण झाला होता. उत्तर प्रदेश सरकारचे गृह सचिव मोहित गुप्ता आणि मेळा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी अविमुक्तेश्वरानंद यांच्या शिष्यांचा वाद झाला होता. या वादादरम्यान अधिकाऱ्यांकडून शिष्यांशी गैरवर्तन व मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर नाराज झालेल्या अविमुक्तेश्वरानंद यांनी संगम स्नान करण्यास नकार दिला आणि तेव्हापासून ते आपल्या शिबिराबाहेरच ठिय्या मांडून बसले आहेत. या पार्श्वभूमीवर आता मेळा प्राधिकरणाने त्यांना नोटीस बजावल्याने वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. नोटिशीनुसार, अविमुक्तेश्वरानंद यांनी २४ तासांच्या आत आपली भूमिका स्पष्ट करणे बंधनकारक आहे. अन्यथा पुढील प्रशासकीय कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

प्रयागराज माघ मेळ्याचा समारोप महाशिवरात्रीला होणार असून त्या दिवशी अखाड्यांचे अंतिम स्नान पार पडते. २०२६ च्या माघ मेळ्यात आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी संगमात स्नान केले असून दररोज लाखो भाविकांची गर्दी संगम तटावर उसळत आहे. या पार्श्वभूमीवर शंकराचार्य पदावरील वाद आणि प्रशासनाची नोटीस ही बाब मेळ्याच्या काळात मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे.

न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की, या पदावर कोणालाही बसवण्यावर बंदी आहे. या प्रकरणात अद्याप कोणताही नवीन आदेश आलेला नाही आणि प्रकरण अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे. याउलट, माघ मेळ्यादरम्यान अविमुक्तेश्वरानंद यांनी त्यांच्या शिबिरात लावलेल्या फलकावर स्वतःला “ज्योतिष्पीठाचे शंकराचार्य” असे लिहिले आहे.

अखिलेश यादव यांचा शंकराचार्यांना पाठिंबा

सोमवारी संध्याकाळी सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी फोनवरून शंकराचार्यांशी चर्चा करून त्यांना आपला पाठिंबा व्यक्त केला. मी तुमच्यासोबत आहे, लवकरच भेटायला येईन, असे अखिलेश यांनी शंकराचार्यांना सांगितले.

इराणी युद्धनौकेवर अमेरिकेच्या पाणबुडीचा हल्ला, ८७ ठार; श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ झालेल्या हल्ल्यात जहाजाला जलसमाधी

तेंडुलकर कुटुंबात सनई-चौघडे! अर्जुन तेंडुलकर-सानिया चंडोक विवाहबद्ध; राजकारणी ते बॉलिवूड दिग्गजांची उपस्थिती

IND vd ENG ICC T20 WC26 : वानखेडेवर आज अहमदाबादचे तिकीट? इंग्लंडला नमवून अंतिम फेरी गाठण्याचे भारताचे ध्येय

पुण्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग चाचणी

मिठी नदी गाळ घोटाळा : EOW कडून दुसरे पुरवणी आरोपपत्र दाखल