अचानक झाडाची फांदी डोक्यावर पडल्याने दुचाकीस्वार कोमात, घटना सीसीटीव्हीत कैद 
राष्ट्रीय

अचानक झाडाची फांदी डोक्यावर पडल्याने दुचाकीस्वार कोमात, घटना सीसीटीव्हीत कैद

बेंगळुरूमध्ये दुचाकीस्वाराच्या डोक्यावर झाडाची सुकलेली फांदी पडल्याने तो गंभीर जखमी होऊन कोमात गेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून ते फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

Mayuri Gawade

बंगळुरूमधील राम मंदिर रोड परिसरात झाडाची सुकलेली फांदी अचानक डोक्यावर पडल्याने ५३ वर्षीय दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असून तो कोमात आहे. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

जखमी व्यक्तीची ओळख सुरेश अशी असून ते खासगी वित्तीय कंपनीत कार्यरत आहेत. बुधवारी (दि. २५) सायंकाळी कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी विविध ग्राहकांकडे जात असताना हा अपघात घडला.

सीसीटीव्हीत कैद झाला थरार

परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. फुटेजमध्ये सुरेश हेल्मेट न घालता दुचाकी चालवत असल्याचे दिसते. त्याचवेळी रस्त्यालगतच्या झाडाची मोठी सुकलेली फांदी अचानक तुटून थेट त्यांच्या डोक्यावर पडली. या जोरदार धडकेमुळे त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ते रस्त्यावर कोसळले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते घटनास्थळीच बेशुद्ध झाले.

रुग्णालयात उपचार सुरू

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत सुरेश यांना राजाजीनगर येथील रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांकडून प्राथमिक चौकशी

या प्रकरणी राजाजीनगर पोलीस ठाण्यात एनसीआर (नॉन-कॉग्निझेबल रिपोर्ट) दाखल करण्यात आला असून पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित झाडाची पाहणी केली.

वन विभागावर निष्काळजीपणाचा आरोप

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी वन विभागावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. परिसरातील अनेक झाडांच्या सुकलेल्या आणि धोकादायक फांद्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणतीही छाटणी किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली नसल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. वेळेत सुकलेल्या फांद्या काढून टाकल्या असत्या, तर हा अपघात टाळता आला असता, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

बदलापुरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात; १६ ऑक्टोबरपासून चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा बंद

Mumbai : स्वतः बसवलेल्या CCTV मध्येच कैद झाला मृत्यूचा क्षण! घाटकोपरमध्ये भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Kalyan-Dombivli : केडीएमसीत ३६ तास पाणीकपात; १५ ऑक्टोबरला २४ तास पाणीपुरवठा बंद

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...