सौजन्य : X @RetweetMarathi
राष्ट्रीय

अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई भारताचे नवे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार पदाची शपथ

भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना हे १३ मे रोजी निवृत्त होत असून त्यानंतर न्या. भूषण गवई हे सरन्यायाधीश होणार आहेत. ते भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून १४ मे रोजी शपथ घेतील.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना हे १३ मे रोजी निवृत्त होत असून त्यानंतर न्या. भूषण गवई हे सरन्यायाधीश होणार आहेत. ते भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून १४ मे रोजी शपथ घेतील. राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू त्यांना सरन्यायाधीशपदाची शपथ देतील. भूषण गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते, माजी आमदार, खासदास आणि बिहार, सिक्कीम व केरळ राज्यांचे राज्यपाल रा. सु. गवई आणि कमलाताई गवई यांचे पुत्र आहेत.

सर्वोच्च न्यायालयातील सध्याच्या न्यायमूर्तींमध्ये भूषण गवई ज्येष्ठ असून पुढचे सरन्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होणारे गवई हे नागपूर बार असोसिएशनचे तिसरे सदस्य आहेत. याआधी न्या. मोहम्मद हिदायतुल्ला आणि शरद बोबडे हे सरन्यायाधीश झाले होते.

अमरावतीत जन्मलेल्या भूषण गवई यांनी नागपूर विद्यापीठात कला शाखेतून पदवी घेतली. मुंबईतून कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी १९८५ मध्ये वकिलीला सुरुवात केली. काही काळ त्यांनी मुंबई आणि अमरावतीमध्ये काम केले. नागपूर बार असोसिएशनमध्ये न्यायमूर्ती गवई १९८५ मध्ये सहभागी झाले. त्यानंतर १९८७ ते १९९० या कालावधीत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र वकिली सुरू केली होती.

मुंबई उच्च न्यायालय, नागपूर, औरंगाबाद, पणजी खंडपीठात न्यायमूर्ती म्हणूनही भूषण गवई यांनी काम केले आहे. २००३ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश झाले होते. त्यानंतर २००५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश बनले. २०१९ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून शिफारस केली गेली. त्यानंतर आता त्यांची सरन्यायाधीश पदासाठी शिफारस करण्यात आली आहे. भूषण गवई हे २३ नोव्हेंबरला निवृत्त होणार असून त्यांचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असेल.

IPO चा जोर कायम; जिओ प्लॅटफॉर्म्ससह डझनभर कंपन्या प्राथमिक बाजारात उतरणार

जंतर-मंतरवर आता आंदोलन करता येणार नाही; दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय, तीन नवी ठिकाणे निश्चित

WhatsApp वर आता मेसेज शेड्यूल करता येणार; ठरलेल्या वेळी आपोआप पाठवला जाणार, जाणून घ्या फीचर कसं काम करणार

Mumbai : कोस्टल रोडवर उभारणार अत्याधुनिक बायो टॉयलेट; पालिका करणार ४ कोटी १९ लाख रुपये खर्च

Period Problems : महिन्यातून दोनदा पाळी येतेय? महिलांनो, दुर्लक्ष करू नका; डॉक्टर सांगतात...