नवी दिल्ली : राज्यसभेत काँग्रेसचे खासदार अभिषेक मनु सिंघवी यांना नेमून दिलेल्या आसनावर सुरक्षा कर्मचाऱ्यांना ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल सापडल्याचे शुक्रवारी सभापती जगदीप धनखड यांनी जाहीर केल्यानंतर सभागृहात गदारोळ माजला आणि सत्तारूढ व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून सापडलेल्या चलनी नोटा खऱ्या होत्या की खोट्या ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, या संपूर्ण घटनेवर अभिषेक मनु सिंघवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण राज्यसभेत जाताना फक्त ५०० ची एक नोट बरोबर ठेवतो, आपण या प्रकरणाबद्दल पहिल्यांदाच ऐकतोय, गुरुवारी आपण बरोबर १२ वाजून ५७ मिनिटांनी सभागृहात आलो. सभागृहाचे कामकाज १ वाजता तहकूब झाले. त्यानंतर आपण उपहारगृहामध्ये १ वाजून ३० मिनिटांपर्यंत अयोध्या प्रसाद यांच्याबरोबर बसून होतो आणि नंतर निघून गेलो, असे सिंघवी यांनी म्हटले आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ही घटना अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे. त्यांनी हा सभागृहाच्या प्रतिष्ठेवर हल्ला असल्याचे म्हटले आहे. त्यांनी यादरम्यान सिंघवी यांचे नाव देखील घेतले. नड्डा यांनी सिंघवी यांचे नाव घेतल्यानंतर काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्याला आक्षेप घेतला. खर्गे म्हणाले की, आपण विनंती करतो की जोपर्यंत या घटनेचा तपास पूर्ण होत नाही आणि याची सत्यता तपासली जात नाही तोपर्यंत कोणत्याही सदस्याचे नाव घेतले जाऊ नये.
सभापती जगदीप धनखड म्हणाले की, आपण सदस्यांना सूचित करीत आहोत की, गुरुवारी सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर सभागृहाची नियमित तपासणी सुरू होती. सध्या अभिषेक मनू सिंघवी यांना देण्यात आलेल्या आसनावरून चलनी नोटांचे बंडल सुरक्षा अधिकार्यांनी जप्त केले आहे. ही बाब लक्षात आणून देण्यात आल्यानंतर आपण चौकशीचे आदेश दिले आहेत आणि सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या नोटांवर कोणीतरी दावा सांगण्यासाठी पुढे येईल अशी अपेक्षा होती, मात्र कोणीही दावा केलेला नाही, असेही सभापती म्हणाले.
यानंतर सभागृहात गदारोळ निर्माण झाला असता संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, कोणाचे नाव घेतले तर त्याला हरकत का असावी, सभापतींनी आसन क्रमांक सांगितला आहे आणि ते आसन कोणाला नेमून दिले आहे ते सांगितले आहे, असे असताना समस्या काय आहे. सभागृहामध्ये नोटांचे बंडल आणणे योग्य नाही, याची सखोल चौकशी झालीच पाहिजे, असेही ते म्हणाले.
नोटांचे बंडल सापडल्याचे धनखड यांनी सांगितल्यानंतर सभागृहात जोरदार गोंधळ झाला. या मुद्द्यावरून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांमध्ये जोरदार वाद पेटला. काही सदस्यांनी या घटनेच्या चौकशीची मागणी केली तर काहींनी हे एक राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटले.
राज्यसभा कामकाज तहकूब
राज्यसभेतील काँग्रेसचे खासदार अभिषेक मनु सिंघवी यांच्या आसनावर ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल मिळाल्यानंतर भाजपच्या सदस्यांनी सभागृहामध्ये जोरदार गदारोळ माजविल्याने राज्यसभेचे कामकाज शुक्रवारी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.