राष्ट्रीय

Mahadev Betting App Scam : महादेव ॲपप्रकरणी सीबीआयचे छापे

महादेव बेटिंग अ‍ॅपशी संबंधित एका प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बुधवारी छत्तीसगड, भोपाळ, कोलकाता आणि दिल्ली येथील ६० ठिकाणी छापे टाकले.

Swapnil S

नवी दिल्ली : महादेव बेटिंग अ‍ॅपशी संबंधित एका प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बुधवारी छत्तीसगड, भोपाळ, कोलकाता आणि दिल्ली येथील ६० ठिकाणी छापे टाकले. या बेकायदेशीर कारवाईत सहभागी असल्याचा संशय असलेले राजकीय नेते, वरिष्ठ नोकरशहा, पोलीस अधिकारी, महादेव बुकचे प्रमुख अधिकारी आणि इतर खाजगी व्यक्तींच्या घरांवर छापे टाकण्यात आले.

‘महादेव बुक’ हे रवी उप्पल आणि सौरभ चंद्राकर प्रवर्तक असलेले एक ऑनलाइन बेटिंग व्यासपीठ आहे, हे दोघेही सध्या दुबईमध्ये आहेत. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, या प्रवर्तकांनी त्यांचे बेकायदेशीर नेटवर्क सुरळीत चालावे यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना संरक्षण शुल्क म्हणून मोठ्या प्रमाणात पैसे दिले होते.

रेड कॉर्नर नोटीस

महादेव अ‍ॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर यांना इंटरपोलने ‘रेड कॉर्नर’ नोटीस जारी केल्यानंतर नोव्हेंबर २०२४ मध्ये दुबईतून अटक करण्यात आली. ईडीच्या विनंतीवरून ही नोटीस जारी करण्यात आली आहे. सीबीआयने सांगितले की, या प्रकरणाच्या तपासादरम्यान महत्त्वाचे डिजिटल आणि कागदोपत्री पुरावे जप्त करण्यात आले आहेत.

हा गुन्हा आधी आर्थिक गुन्हे शाखेने रायपूरमध्ये दाखल केला होता. पण, नंतर छत्तीसगड सरकारने सखोल चौकशीसाठी हे प्रकरण सीबीआयकडे दिले. सीबीआयने आता या प्रकरणात वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि इतर आरोपींच्या भूमिकेची चौकशी सुरु केली आहे.

बघेल यांच्या निवासस्थानी छापा

आज सकाळी सीबीआयने छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्या घरांवरही छापे टाकले. महादेव बेटिंग अॅपशी संबंधित एका प्रकरणात हा छापा टाकण्यात आला आहे. भूपेश बघेल आज दिल्लीला रवाना होणार होते, तिथे ते काँग्रेसच्या अखिल भारतीय काँग्रेस समिती च्या 'मसुदा समिती'च्या बैठकीला उपस्थित राहणार होते.

माणुसकीच्या निष्पापांसंगे युद्ध आमुचे सुरू...

आजचे राशिभविष्य, ७ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर; वाचा सर्व महत्त्वाच्या घोषणा एकाच क्लिकवर

क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! पश्चिम रेल्वेकडून मुंबई-अहमदाबाद स्पेशल ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक

राज्याचा आर्थिक विकासदर वाढीचा वेग सर्वात कमी; ४ मोठ्या राज्य अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्र मागेच