राष्ट्रीय

सर्दी, तापावरील या औषधांवर केंद्र सरकार लवकरच बंदी घालण्याची शक्यता

वृत्तसंस्था

सर्दी, ताप यासाठी असलेल्या टॅब्लेट, कफ सिरप यासाठी आपण घेत असलेल्या डी कोल्ड टोटल सह १९ औषधांवर केंद्र सरकार लवकरच बंदी घालण्याची शक्यता आहे.

अशा सिरप किंवा टॅब्लेटमध्ये एकापेक्षा जास्त औषधे असतात. त्यांना फिक्स्ड ड्रग कॉम्बिनेशन (FDCs) म्हणतात. सामान्य भाषेत याला कॉकटेल औषध असेही म्हणतात. विकसित देशांमध्ये एकापेक्षा जास्त औषधांचे मिश्रण करून तयार केलेल्या औषधांच्या विक्रीवर बंदी आहे. आता भारताने अशा १९ सिरप आणि गोळ्यांची यादी तयार केली असून त्यांच्यावर लवकरच बंदी घातली जाऊ शकते.

डॉ. एम.एस. भाटिया, प्राध्यापक आणि प्रमुख, मानसोपचार विभाग, युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीने केंद्रीय औषध मानक आणि नियंत्रण संघटनेकडून १९ एफडीसीची यादी तयार केली. ही यादी आता आरोग्य मंत्रालयाला देण्यात आली असल्याने त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

१९ औषधे कोणती ?

तज्ज्ञ समितीने लिस्ट केलेल्या १९ एफडीसीमध्ये सुमो, निसिप, डी कोल्ड टोटल, कफ सिरप टेडीकॉफ, ग्रिलिंक्टस, कोडीस्टार, टॉसेक्स, एस्कोरिल सी, पिरिटन एक्सपेक्टोरंट आणि अँटीबायोटिक क्लिंडामायसिन यांचा समावेश आहे. या औषधांचे उत्पादन करणाऱ्या फार्मा कंपन्यांमध्ये अल्केम, सिप्ला, रेकिट बेंकिसर, प्रॉक्टर अॅण्ड गॅम्बल, मॅनकाइंड फार्मा, अॅबॉट, ग्लेनमार्क आणि ग्लॅक्सोस्मिथक्लाइन यांचा समावेश आहे.

बंदी घालण्याचा विचार का?

एकापेक्षा जास्त औषधांचे मिश्रण असलेल्या सिरप किंवा टॅब्लेटला एफडीसी किंवा कॉकटेल औषध म्हणतात. कॉकटेल औषधाच्या वाढत्या वापराचे काही दुष्परिणाम दिसून आले आहेत. अँटिबायोटिक कॉकटेल औषधांच्या जास्त वापरामुळे अँटिबायोटिक परिणामकारकता कमी होण्याचा धोका आहे. यामुळेच आता सरकारने कॉकटेल ड्रग्जवर कडक भूमिका घेतली आहे.

सुसंस्कृत महाराष्ट्रात, नको अभद्र भाषा

नाशिक शिंदेंकडेच! हेमंत गोडसे यांना मिळाली उमेदवारी

अखेर ठरले! महायुतीने ठाण्यातून शिंदे गटाचे शिलेदार नरेश म्हस्के, कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना दिली उमेदवारी

पंतप्रधान मोदींनी पवारांवर केलेल्या 'त्या' टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर; "वखवखलेला आत्मा..."

LPG Price Cut : व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात; आजपासून लागू होणार नवे दर