मुंबई : कॉकरोच जनता पार्टी या नव्या पक्षाने सध्या सोशल मीडियात धमाल उडवून दिली आहे. देशातील वाढती बेरोजगारी, परीक्षांमधील घोटाळे आणि तरुणांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी चारच दिवसांपूर्वी या पार्टीच्या नावाने इन्स्टाग्रामवर एक खाते उघडण्यात आले. त्यानंतर तीन ते चार दिवसांत कॉक्रोच जनता पार्टीचे इन्स्टाग्रामवर दीड कोटी फॉलोअर्स झाले आहेत. कॉकरोच जनता पार्टीने फॉलोअर्सच्या बाबतीत भाजपलाही मागे टाकलं आहे.
मूळचा हिंगोलीचा असलेल्या व सध्या अमेरिकेत उच्च शिक्षण घेणाऱ्या अभिजीत दिपके याने याची स्थापना केली असून राजकीय क्षेत्रात नवी वाट चोखाळण्याचा इरादा त्याने विविध माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये बोलून दाखवला आहे. दिपके हा पूर्वी आम आदमी पक्षाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. त्याच्या या उपक्रमामुळे नेपाळमधील जेन झी आंदोलनाप्रमाणे किंवा तमिळनाडूतील अलीकडच्या सत्ताबदलाप्रमाणे राजकारणात नवीन उलथापालथी होतील अशी अपेक्षा तरुणांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या कॉक्रोच जनता पार्टीचं एक्स अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील बेरोजगारांना कॉकरोच म्हटल्याचं एक वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं आणि त्यानंतर या चळवळीला सुरुवात झाली. सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान, एका वकिलाच्या सोशल मीडिया खात्याचा संदर्भ देताना तरुणांना “कॉकरोच” (झुरळे) आणि परजीवी असे संबोधले होते.
सरन्यायाधीशांच्या या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, नंतर सरन्यायाधीशांनी माध्यमांनी माझे विधान “चुकीच्या पद्धतीने मांडले” आहे, असा दावा केला होता. “मी केवळ खोट्या आणि बनावट पदव्यांच्या आधारे वकिली, मीडिया किंवा सोशल मीडियामध्ये शिरलेल्या लोकांवर टीका केली होती. असे लोक समाजासाठी परजीवी आहेत, असे म्हटले होते असे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीचं एक्स खातं बॅन केल्याबद्दल बोलताना आम आदमी पक्षाचे माजी नेते योगेंद्र यादव म्हणाले की हे लोक ज्या प्रकारे बाहेरुन जितके बळकट असल्याचं दाखवतात ते आतून कमजोर आहेत, घाबरले आहेत. ही एक चळवळ आहे, कॉकरोचच्या चिन्हामागं देशातील तरुण आहेत, तरुणी आहेत आणि त्यांचा राग आहे. आज आपण त्यांच्यासोबत उभं राहायला पाहिजे.
खाते बंद, पुन्हा चालू
‘कॉकरोच जनता पार्टी’चे अधिकृत खाते भारतात प्रतिबंधित केले आहे. इन्स्टाग्रामवर ८८ लाख फॉलोअर्स असलेल्या भारतीय जनता पक्षाला मागे टाकत, या पक्षाने १२.४ दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला. त्यानंतर अवघ्या काही तासांतच ही कारवाई करण्यात आली. याबाबत माहिती देताना दिपके यांनी आपल्या दुसऱ्या पोस्टमध्ये, “अपेक्षेप्रमाणे, कॉकरोच जनता पार्टीचे खाते भारतात प्रतिबंधित करण्यात आले आहे,” असे नमूद केले. त्यानंतर, त्यांनी @Cockroachisback या नावाने नवीन खाते सुरू केल्याची घोषणा केली.
दरम्यान, केवळ ‘एक्स’वरच नव्हे, तर आपल्या इन्स्टाग्राम खात्यावरही हॅकर्सकडून हल्ले करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा दिपके यांनी केला आहे.