नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशात भारतीय आणि चिनी सैन्यादरम्यान झालेल्या कथित चकमकींच्या घटनांवरून काँग्रेसने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. सीमावर्ती परिस्थितीबाबत पंतप्रधानांनी सविस्तर निवेदन देऊन देशाला आणि संसदेला विश्वासात घ्यावे, अशी मागणी काँग्रेसने केली.
चीनच्या राष्ट्राध्यक्षांसोबतच्या बैठकांमध्ये सीमावादाचा मुद्दा उपस्थित न केल्याबद्दल विरोधी पक्षाने मोदी यांच्यावर ‘भित्रेपणा’चा आरोप केला. भारताचे हितसंबंध चीनसमोर गहाण पडू देता कामा नयेत, असेही काँग्रेसने स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदी यांनी २०२० मध्ये पूर्व लडाखमधील हिंसक संघर्षानंतर चीनला दिलेल्या कथित ‘क्लीन चिट’मुळे चीनचे मनोबल वाढले आणि त्याने अरुणाचल प्रदेशातही आक्रमक भूमिका घेतली, असा आरोप काँग्रेसने केला.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले, ‘चीनला वारंवार ‘क्लीन चिट’ देणे आता पुरे झाले. पंतप्रधान मोदी यांनी देशासमोर सत्य मांडावे!”
चीनने गस्त पद्धत बदलल्यास स्थिती बिघडते, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा
नवी दिल्ली : चीनचे सैन्य निर्धारित गस्त पद्धतीपासून विचलित झाल्यास भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) परिस्थिती वेळोवेळी बिघडते, असे भारताने शुक्रवारी स्पष्ट केले. सीमावर्ती भागात शांतता आणि स्थैर्य राखणे हे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असल्याचेही भारताने नमूद केले.
अरुणाचल प्रदेशात सीमेवरील अनेक भागांत चिनी सैनिकांसोबत अजूनही संघर्षाच्या घटना घडत असल्याच्या भारत-तिबेट सीमा पोलीस दलाचे (आयटीबीपी) महासंचालक शत्रुजीत कपूर यांनी केलेल्या विधानावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी तसेच गैरसमज आणि चुकीचे आकलन टाळण्यासाठी दोन्ही देश विद्यमान राजनैतिक आणि लष्करी यंत्रणांच्या माध्यमातून प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. सीमावर्ती भागात शांतता आणि स्थैर्य राखणे हे द्विपक्षीय संबंधांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे, यावरही मी भर देऊ इच्छितो, असे ते म्हणाले.