राष्ट्रीय

राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेबांधणी; काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नोबेल पुरस्कारावरून त्रागा केलेला असतानाच दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची तुलना थेट शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या मारिया मचाडो यांच्याशी केली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नोबेल पुरस्कारावरून त्रागा केलेला असतानाच दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची तुलना थेट शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या मारिया मचाडो यांच्याशी केली आहे.

ट्रम्प संतप्त

दक्षिण अमेरिकेतील लोकशाही चळवळीला बळ देणाऱ्या व्हेनेझुएलातील विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना शांततेसाठी यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार आपल्यालाच मिळावा, यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले ट्रम्प यांनी नोबेल पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला.

मचाडो-राहुल तुलना

मचाडो यांनी २०२४च्या निवडणुकीत सलग १२ वर्षे सत्तेत असलेले हुकूमशाही प्रवृत्तीचे व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस माडुरो मोरेस यांच्या विरोधात रणशिंग फुंकले. व्हेनेझुएलाच्या नागरिकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देणे, तसेच हुकूमशाहीतून लोकशाहीकडे न्याय्य आणि शांततापूर्ण मार्गाने जाण्यासाठी मारिया कोरिना मचाडो यांनी केलेल्या संघर्षाची दखल घेत त्यांना २०२५ या वर्षाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला. यातच काँग्रेस नेत्यांनी मारिया मचाडो यांची तुलना राहुल गांधी यांच्याशी केली.

संविधानासाठी लढत

काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत यांनी मारिया कोरिना मचाडो आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा फोटो एक्सवर शेअर केला. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये ते म्हणतात की,

यावेळेचा नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना संविधानाचे रक्षण केल्याबद्दल मिळाला आहे. भारतात विरोधी पक्षनेते राहुल गांधी देशाचे संविधान वाचविण्यासाठी लढत आहेत.

भाजपचा टोला

भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी एक्सवर पोस्ट करत सुरेंद्र राजपूत यांच्या पोस्टचा समाचार घेतला. पूनावाला यांनी राहुल गांधींना नोबेल देण्याची मागणी विचित्र असल्याचे म्हटले. तसेच त्यांना नोबेल पुरस्कार मिळू शकतो पण तो ढोंगीपणा, खोटे बोलणे, ९९ निवडणुकांमध्ये पराभव होणे, १९७५ आणि १९८४ मध्ये लोकशाही आणि संविधानाची हत्या करणे, या कारणांसाठी त्यांना नक्कीच पुरस्कार मिळायला हवा, असा खोचक टोला पूनावाला यांनी लगावला.

महानगरामध्ये आणखी परवडणारी घरे; उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

विधिमंडळातील आश्वासने ९० दिवसांत होणार पूर्ण; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा विश्वास

नवाजुद्दीन सिद्दीकीला न्यायालयाचा झटका; भावाविरोधातील मानहानीचा खटला फेटाळला

जमीन मोजणीचा निपटारा आता 30 दिवसांत! प्रकरणे मार्गी लागणार; खासगी भूमापकाची मोजणी सरकारी अधिकारी करणार

संघासारखी संघटना नागपूर शहरातच राहू शकते; सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन