दिल्लीत मुसळधार पावसाचा तडाखा; खराब हवामानामुळे २६ उड्डाणे रद्द, १५ विमानांचे बदलले मार्ग  (Photo-X)
राष्ट्रीय

दिल्लीत मुसळधार पावसाचा तडाखा; खराब हवामानामुळे २६ उड्डाणे रद्द, १५ विमानांचे बदलले मार्ग

भारतीय हवामान विभागाने दिल्लीसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राजधानीत गडगडाट, जोरदार वारे आणि...

किशोरी घायवट-उबाळे

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सोमवारी (दि. २४) मुसळधार पाऊस आणि वादळी हवामानामुळे विमान वाहतूक विस्कळीत झाली. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर खराब हवामानामुळे २६ उड्डाणे रद्द करण्यात आली, तर १५ विमानांचे मार्ग बदलण्यात आले. दिल्लीच्या अनेक भागांत पाणी साचल्याने जनजीवनावरही परिणाम झाला. भारतीय हवामान विभागाने (IMD) राजधानीत मुसळधार पाऊस, गडगडाट आणि जोरदार वाऱ्याचा इशारा देत रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

२६ उड्डाणे रद्द, १५ विमानांचे मार्ग बदलले

माहितीनुसार, मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे दिल्ली विमानतळावरील विमान वाहतूक विस्कळीत झाली. दिल्लीला येणारी १५ विमाने जयपूरमधील १२, चंदीगडमधील २ आणि लखनऊमधील १ विमानतळाकडे वळवण्यात आली. खराब हवामानामुळे २६ उड्डाणे रद्द करण्यात आली.

अनेक भागांत साचले पाणी

सोमवारी दिल्लीतील अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रविवारी जाणवलेल्या उकाडा आणि दमट हवामानापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला.

सकाळपर्यंत १८ ते २८ मिमी पाऊस

सोमवारी सकाळी ११.३० वाजेपर्यंत दिल्लीतील विविध भागांत १८ ते २८ मिमी पावसाची नोंद झाली. दक्षिण दिल्लीतील छतरपूर परिसरात सर्वाधिक पाऊस नोंदवण्यात आला.

गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने दिल्लीसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राजधानीत गडगडाट, जोरदार वारे आणि मुसळधार ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण-पूर्व, पूर्व, शाहदरा, मध्य, उत्तर-पूर्व, दक्षिण, नवी दिल्ली आणि उत्तर दिल्लीसह अनेक भागांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दक्षिण-पश्चिम, पश्चिम आणि उत्तर-पश्चिम दिल्लीतील काही भागांतही जोरदार पावसाची शक्यता आहे.

तापमानातही घट

राजधानीत सोमवारी किमान तापमान २७.८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. रिज (Ridge) परिसरात सर्वात कमी किमान तापमान २४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

ऑगस्टच्या सरासरीपेक्षा अधिक पाऊस

दिल्लीतील प्रमुख हवामान केंद्र असलेल्या सफदरजंग येथे २४ ऑगस्टपर्यंत १२ पावसाळी दिवसांत २४६.२ मिमी पाऊस नोंदवण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्याची दीर्घकालीन सरासरी २२६.८ मिमी आहे. त्यामुळे यंदा ऑगस्टमध्ये आतापर्यंत झालेला पाऊस सरासरीपेक्षा अधिक झाला आहे.

मागील दोन वर्षांपेक्षा यंदा पाऊस कमी

ऑगस्टमधील पावसाची एकूण नोंद सरासरीपेक्षा अधिक असली, तरी मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदाचा पाऊस अद्याप कमी आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये दिल्लीत ४००.८ मिमी, तर ऑगस्ट २०२४ मध्ये ३९०.३ मिमी पावसाची नोंद झाली होती.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पालिकेचा भूखंड भाडेपट्ट्यावर देणार; मुंबई महापालिकेला ४७० कोटींचा महसूल मिळणार; ६० वर्षांसाठी देणार भूखंड

Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्या तिघांना अटक; मुंबई पोलिसांनी राजस्थानच्या कोटामधून घातल्या बेड्या

ठाण्याचे रस्ते जाम, वाहतूक यंत्रणा सुस्त! बेशिस्त पार्किंग, जुनाट सिग्नल यंत्रणा आणि अतिक्रमणांमुळे नागरिक त्रस्त

Pune : निष्काळजीपणाचा बळी! ड्रेनेजच्या १५ फूट खोल खड्डयात पडून ज्येष्ठ नागरिकाचा करुण अंत, घटना CCTV मध्ये कैद

दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी; एकनाथ शिंदे यांची ग्वाही, दसरा मेळाव्याच्या दिवशी दिवाळीचा शिधा पाठवणार